तरंदळे धरणातील प्रेमी युगुलाच्या आत्महत्येत धक्कादायक मेसेज समोर
कणकवली : तरंदळे धरणावर उडी घेऊन जीवन संपवणाऱ्या सोहम चिंदरकर (१८, कलमठ – कुंभारवाडी) आणि ईश्वरी राणे (१८, कणकवली – बांधकरवाडी) या प्रेमी युगुलाच्या आत्महत्येमागील धक्कादायक कारण पोलीस तपासातून समोर आले आहे. हरवलेला मोबाईलच या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी सोहमने आपल्या आईच्या मोबाईलवरून ईश्वरीला सलग व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले होते. यात “माझा मोबाईल हरवला आहे. त्यात काही आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ आहेत. मोबाईल कोणाला मिळाल्यास माझी बदनामी होईल, त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे” असा संदेश त्याने दिल्याचे पोलिसांना आढळले.
सोहमची ही मानसिक स्थिती पाहून ईश्वरीने त्याला शांत करण्याचा प्रयत्नही केला. परंतु सोहम काही ऐकण्यास तयार नसल्याने ईश्वरीनेही “तुझ्याशिवाय मी कशी जगू? आपण दोघांनी एकत्रच जीवन संपवूया” असा संदेश पाठविल्याचे मेसेज तपासात उघड झाले आहे.
या मेसेज संभाषणात दोघांनी कुठे भेटायचे हेही ठरवले होते. त्यानुसार दोघे तरंदळे धरण परिसरात गेले आणि पाण्यात उडी घेत आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, सोहमचा हरवलेला मोबाईल पोलिसांच्या हाती लागला की नाही, याबाबत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.












