वेंगुर्ले शहरात विविध कार्यक्रमांनी करण्यात आली मतदार जनजागृती

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित करून मतदार जनजागृती करण्यात आली.

यात नगरपरिषद आणि बी.के.कॉलेज राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमान चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रा.डी.बी.गोसावी, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपेश परब, नगरपरिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, दिवे शहरस्तरीय तांत्रिक कक्ष अभियंता प्रतिक डोंगर, शहर समन्वयक पूर्वा मसुरकर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख राम चव्हाण, प्रा.नंदगिरीकर, विवेक चव्हाण, प्रा.प्रियांका प्रभू, विनय पालकर उपस्थित होते.

निवडणूक विषयावर शहरातील शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. याता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेंगुर्ला मार्केट, आनंदवाडी, म्हाडा, नगरपरिषद कार्यालय, शाळा, कॉलेज, भटवाडी आदी परिसरात मतदार जनजागृतीपर शपथ घेण्यात आली. घंटागाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जनजागृतीपर रिल्सही बनविण्यात आले. पाटकर हायस्कूल आणि मदर तेरेसा शाळेमधील सुमारे २५० मुलांच्या सहभागात दाभोली नाका, मार्केट, रामेश्वर मंदिर, पिराचा दर्गा ते दाभोली नाक्यापर्यंत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. सेल्फि पॉईंट व नागरिकांच्या स्वाक्षरी घेण्यात आली.

दरम्यान, मुंबई विद्यापिठ उपपरिसर सिंधुदुर्ग एमएसडब्ल्यू कॉलेज यांनी मतदार जनजागृती अभियानांतर्गत वेंगुर्ला बाजारपेठ व दाभोली नाका येथे पथनाट्य सादर केले.