कुडाळ येथे फार्मर कप स्पर्धेचे शेतकरी प्रशिक्षण संपन्न

कुडाळ:-
कुडाळ येथील तालुका कृषी अधिकारी आणि पानी फाउंडेशनमार्फत सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण मराठा समाज हॉल, कुडाळ येथे दिनांक 26 रोजी आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणासाठी उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी श्री. अनिकेत कदम, तालुका कृषी अधिकारी कुडाळ श्री भास्कर चौगले, मंडळ कृषी अधिकारी गायत्री तेली , तानाजी सगरे,पानी फाउंडेशनचे विभागस्तरीय समन्वयक श्री प्रशांत गवंडी, सर्व उपकृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले यांनी केले. कार्यशाळेला पानी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या खरीप हंगाम 2026 मध्ये सुरू होणाऱ्या फार्मर कप स्पर्धेकरिता सहभागी होण्याची इच्छा असणारे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्री अनिकेत कदम यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या फार्मर कप स्पर्धेत सहभागी होऊन आपले गाव समृद्ध करावे, असे आवाहन केले. पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक/मुख्य प्रशिक्षक प्रशांत गवंडी, नवनाथ शिंदे, सूरज कोळसे, शुभम कुरुंदवाडकर यांनी फार्मर कप स्पर्धेचे निकष व गरज याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सहायक कृषी अधिकारी धनंजय कदम यांनी केले. शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सदर प्रशिक्षण पार पडले.