समाजात वाढत चाललेले ताण तणाव नैराश्य आरोग्यासाठी घातक: आरोग्य विभाग सतर्क

अशा समस्यांसाठी १४४१६ या टोल फ्रीवर संपर्क साधण्याचे आवाहन.

सिंधुनगरी प्रतिनिधी

मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकेच महत्वाचे आहे. स्वतःला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना ताण-तणाव, चिंता, नैराश्य किंवा भावनिक अस्वस्थता जाणवत असल्यास आरोग्य विभागाशी तात्काळ संपर्क साधावा व या संदर्भातील कोणत्याही समस्यांसाठी १४४१६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

बिघडत चाललेल्या मानसिक आरोग्याबाबत राज्याच्या आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ए आय प्रणालीचा वापर व अन्य आरोग्याचे उपक्रम याचा आढावा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला. आरोग्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मा.डॉ. रामजी आडकेकर यांनी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे भेट देवून आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मा.डॉ. राम आडकेकर यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबूडकर यांची भेट घेतली. आरोग्य विभागाच्या योजना व आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविणेबाबात चर्चा केली. तसेच आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा छत्रपति शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी घेतला.

अनेक कारणामुळे नागरिक युवक युवती विद्यार्थी यांच्यामध्ये ताण-तणाव, चिंता, नैराश्य, नातेसंबंधातील समस्या, परीक्षेचा दबाव, आर्थिक तणाव किंवा स्मृति संबंधित अडचणी यांसारख्या भावनिक आव्हानांविषयी खुलेपणाने बोलू लागले आहेत, ही सकार मानसिक आरोग्य महत्वाचे असल्याची जाणीव वाढत असून वेळेवर मदत घेणे ही सुदृढतेकडे जाणारी महत्वाची पायरी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांचे मार्फत आरोग्य विभागाने नागरिकांना मानसिक आरोग्याविषयी अधिक सजग राहण्याचे आणि गरज भासल्यास तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित मदत घेतल्यास नैराश्य, भीती, ताण-तणाव यांसारख्या स्थितीवर योग्य वेळी नियंत्रण मिळवणे शक्य होते. मानसिक आरोग्य हा व्यक्तीच्या एकूण आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. याकडेही नागरिकांचे आरोग्य विभागाने लक्ष वेधले आहे.

या बैठकीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सहाय्यक संचालक कुष्ठरोग आरोग्य सेवा सिंधुदुर्ग डॉ. सतिश गुजलवार, जिल्हा शल्य चिकित्सक (प्रभारी) जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग डॉ. सुबोध इंगळे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी, वैदयकिय अधिक्षक ग्रा.र./उपजिल्हा रुग्णालय, वैदयकिय अधिकारी प्रा.आ. केंद्र, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, कार्यक्रम समन्वयक, तालुका समुह संघटक, गट प्रवर्तक उपस्थित होते.