देवरूख (प्रतिनिधी) :
संगमेश्वर तालुक्यात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गौरी गणपतींना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करण्यात आला. तालुक्यात भक्तीमय वातावरणात लाडक्या गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनावेळी वरूणराजाने जोरदार हजेरी लावली होती.
तालुक्यात गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाल्यावर घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी गणरायाचे आगमन झाल्यानंतर दरदिवशी भक्तीभावे पूजाअर्चा करण्यात आली. या कालावधीत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दररोज आरती, भजन, जाखडी, महिलांचे टिपरी नृत्य असे कार्यक्रम झाले. यामुळे तालुक्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. घरोघरी आरत्यांचे सूर घुमत होते. सहा दिवस लाडक्या गणरायाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर जड अंतकरणाने मंगळवारी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
तालुक्यातील अनेक गावात दुपारी ३ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बेंजोच्या तालावर नाचत लाडक्या बाप्पाची विसर्जन काढण्यात आली. मिरवणुकीत गणेशभक्त नाचण्यात दंग झाल्याचे पहावयास मिळाले. विसर्जनस्थळी मिरवणूका आल्यावर बाप्पाची आरती करण्यात आली. यानंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन वेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून देवरूख, संगमेश्वर, साखरपा पोलीसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.












