‘ओंकार’ अत्याचार प्रकरणी  गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरू

बांदा : प्रतिनिधी

 

‘ओंकार’ हत्तीवरील अत्याचार प्रकरणी वनखात्याने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी काल बांदा येथील श्रीराम चौकात ठिय्या आंदोलन केले. ठिय्या आंदोलनाकडे वनविभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ओंकार प्रेमींनी मुंडन करून वनविभागाचा निषेध केला. लेखी निवेदनात दिलेल्या इशाऱ्यानुसार आज सकाळ पासून गुणेश गवस यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली.

 

ओंकार हत्तीला १० नोव्हेंबर रोजी लाकडी दांड्याने मारहाण करणारे तसेच सुतळी बॉम्ब फेकून त्याला मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित दोषींना सेवेतून निलंबित करावे तसेच ओंकारला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावे या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, वनविभाग आश्वासने पूर्ण न करता दिशाभूल करीत असल्याचा आरोप उपोषणकर्ते गुणेश गवस यांनी केला.

 

जोपर्यंत ओंकारला तिलारी येथील नैसर्गिक अधिवासात नेत नाहीत तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका गुणेश गवस यांनी स्पष्ट केली.

 

आंदोलनाला असंख्य नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. वनविभाग विरोधात नागरिकांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.