दुचाकी अपघातात शिरगांव येथील तरुणाचा मृत्यू

शिरगाव( प्रतिनिधी)     देवगड–नांदगाव मार्गावर तोरसोळे फाट्यानजीक गुरुवारी रात्री ७. ५५ च्यासुमारास झालेल्या दुचाकी अपघातात शिरगाव बाजारपेठ येथील मंदार राजेंद्र माळवदे (वय ३५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मंदार माळवदे आणि तुषार जाधव हे दोघेजण दुचाकी (एमएच-०७-एटी-१२६३)ने शिरगावहून वळीवंडेकडे जात असताना तोरसोळे फाट्यानजीक हा अपघात घडला. मात्र अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.या अपघातात चालक मंदार माळवदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तुषार जाधव यांच्या उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. अजित ढवळे व डॉ. रुचा भांडवले यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढे हलविण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, महेंद्र महाडीक, प्रवीण तांबे, गणेश गावडे व नीलेश पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

मंदार माळवदे हे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या शिरगाव शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.