दोडामार्ग l प्रतिनिधी :गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला साटेली गावातील पांडवकालीन पुरातन शिवलिंग आणि नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा गुरुवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. शुभ मुहूर्तावर ब्राह्मण मंडळींच्या मंत्रघोषात कलशशिखर, लिंगेश्वर देवता आणि नंदी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या शानदार धार्मिक सोहळ्यासाठी आणि दर्शनासाठी हजारो भाविकांनी साटेली गावात गर्दी केली होती. साटेली ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पांडवकालीन छोटेखानी मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्प्रतिष्ठापनेचा संकल्प पूर्ण केला.
सकाळी ७ वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरुवात झाली. गावातील महिला, विवाहित स्त्रिया, नातेवाईक आणि सीम-शेजारील गावातील मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदक्षिणा, मंत्रघोषात मंगलाष्टके आणि विधिवत प्रतिष्ठापनेनंतर “हर हर महादेव,” “पार्वती पते हरहर महादेव,” आणि “श्री देवी सातेरी देवीचा जयजयकार” अशा जयघोषाने साटेली नगरी दुमदुमली. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
महापूजा, बलिदान, पूर्णाहुती आणि अभिषेकानंतर आरती झाली व भाविकांना रांगेत दर्शन घेण्यासाठी सोडण्यात आले. सीम-शेजारील गावातील मानकरी यांचा सन्मान करण्यात आला.
जमलेल्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मदत करणाऱ्या पोलीस, वीज महावितरण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. साटेली ग्रामस्थांच्या पुढाकाराने हा सोहळा दिमाखात आणि सुरळीतपणे पार पडला.











