दापोली:- दापोली तालुक्यातील गीम्हवणे जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा येथे शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी पर्यावरण तज्ज्ञ डॉ.प्रशांत परांजपे यांच्या विद्यार्थ्यांसमवेत पर्यावरणीय संवादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचा विषय प्लास्टीक निर्मूलन आणि पर्यावरण संवर्धन असा होता.
डॉ.परांजपे यांनी बालगोपाळांना हसत खेळत आनंददायी संवादातून विविध बोलकी उदाहरणे आणि गदिमांच्या बिन भिंतीची शाळेत नेत निसर्ग वाचायला शिकवला.
विद्यार्थ्यांनी या संवादाच्या वेळी आम्ही खाऊ खाल्ल्यानंतर रॅपर टाकण्यासाठी डस्टबिनचाच वापर करतो .चॉकलेटचे कागदही कोठे टाकत नाही असे सांगितले. या विद्यार्थ्यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घ्यावा असे मत त्यावेळी डॉ . परांजपे यांनी या वेळी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी जास्तीत बीज संकलन करावे असे आवाहन डॉ. परांजपे यांनी करून ,जास्तीत जास्त बीज संकलन करणाऱ्या विद्यार्थांना बक्षीस जाहीर केले. तर आजपासून प्लास्टीक कॅरी बॅग चा बालहट्ट करणार नाही असे शाळेने ठरविल्याचे आभार व्यक्त करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा दामले कारखेले यांनी सांगितले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेणारा आनंददायी पर्यावरणीय खेळ झाल्यानंतर वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.सूत्रसंचालन सुनील राठोड सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंजाजी डुबे, सुखदा गोरड,रुपाली भोईर या शिक्षकांचे सहकार्य लाभले.











