प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापूर: शहरातील शुक्रवार पेठे परिसरात राहणाऱ्या सुमित विक्रांत तेली (वय ३०) याने आपले लग्न ठरत नसल्याने “मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे, दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया” असं भावनिक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेत आपले जीवन संपवले.
सुमित आई–वडील आणि लहान भावासह शुक्रवार पेठेत राहत होता. शहरातील शाहूपुरी भागात रेडियम आर्ट, ट्रॉफी आणि इतर सन्मानचिन्हांची निर्मिती करणारे दुकान तो चालवत होता.
मिलाळलेल्या माहितीनूसार,बुधवारी रात्री सुमित घराबाहेर पडल्यावर रात्री अकराच्या सुमारास त्याने शिवाजी पुलावरून नदीत उडी घेतल्याचे काही ओळखीच्या व्यक्तींनी पाहिले आणि तत्काळ याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. तर लगेचच स्थानिकांनी मदतीचे प्रयत्न केले; मात्र अंधार आणि पाण्याला जास्त प्रवाह असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत चाललेला शोध निष्फळ ठरला. त्यामुळे रात्री शोधमोहीम थांबवावी लागली. गुरुवारी सकाळी अग्निशमन दल, करवीर पोलिस आणि स्थानिक स्वयंसेवकांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवाजी पुलापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. पंचनामा आणि उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असून करवीर पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.













