नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत शहर पोलिसांचा रूट मार्च

​आगामी रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरात रूट मार्च काढला. आज रोजी सायंकाळी ४.३० ते ५.२० वाजेपर्यंत हा रूट मार्च रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आला. रहाटा घर-एसटी स्टँडपासून सुरू झालेला हा मार्ग भुते नाका, बंदर रोड, भैरी मंदिर, किल्ला बायपास, मिरकरवाडा मोहल्ला आणि मिरकरवाडा जेटी असा होता. या रूट मार्चसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) निलेश माईंनकर यांच्या नेतृत्वाखालील पथक, तसेच पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांच्यासह १० पोलीस अंमलदार, ५० होमगार्ड आणि आरसीपीचे ३० जवान, असे एकूण सुमारे ९३ जणांचे मनुष्यबळ वापरण्यात आले.