रत्नागिरी ( प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मतदानाची प्रक्रिया आज मंगळवारी शांततेत सुरू झाली आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, पहिल्या दोन तासांत अर्थात सकाळी ९.३० वाजेपर्यंत १४.२६% मतदान झाले आहे
जिल्ह्यातील एकूण १ लाख ६० हजार ४४८ मतदारांपैकी १८ हजार ८४९ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत जिल्ह्याचे सरासरी मतदानाचे प्रमाण १४.२६% नोंदवले गेले आहे.
जिल्ह्यातील एकूण सात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही निवडणूक होत आहे. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गुहागर नगरपंचायतमध्ये मतदारांचा सर्वाधिक उत्साह दिसून आला आहे, जिथे सर्वाधिक २३.३७% मतदान झाले आहे. यानंतर देवरुख नगरपंचायतीमध्ये १५.९२% मतदान नोंदवले गेले आहे. राजापूर नगरपरिषदेत १४.२५% आणि लांजा नगरपंचायतीत १३.९६% मतदान झाले आहे. खेड नगरपरिषदेत ११.९१%, तर रत्नागिरी नगरपरिषदेत १०.०५% आणि चिपळूण नगरपरिषदेत १०.३८% असे सर्वात कमी मतदान झाले आहे.
सकाळी ९.३० पर्यंत झालेल्या मतदानामध्ये पुरुषांचा सहभाग महिलांपेक्षा अधिक आहे. एकूण ७७,८८५ पुरुष मतदारांपैकी ११,०२८ पुरुषांनी मतदान केले, तर ८२,५६२ महिला मतदारांपैकी ७,८२१ महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.











