आग लागली की जाणीवपूर्वक लावली ? याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चालू
प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापुर: शहरातील टाऊन हॉल बागेसमोर जुन्या तहसील कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या कसबा करवीर चावडीत रविवारी चोरीच्या उद्देशाने आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये महत्वपूर्ण कागदपत्रांचे दोन गट्टे, टेबल, खुर्ची जळून खाक झाली. अज्ञातांनी खिडकीची जाळी फाडून आतील काही कागदपत्रे काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी (दि. १) सकाळी याबाबत ग्राम महसूल अधिकारी किरण भीमराव आंबुलकर (वय ४८, सध्या रा. कसबा गेट, महाद्वार रोड, कोल्हापूर, मूळ रा. बटकणंगले, ता. गडहिंग्लज) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ते सोमवारी (दि. १) पहाटेच्या दरम्यान झाला. कागदपत्रे जळाली की कोणी जाणीवपूर्वक जाळली, याचा शोध लक्ष्मीपुरी पोलिसांकडून सुरू आहे.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसिंगजी रोडवरील कसबा करवीर चावडीतील कर्मचारी शुक्रवारी दुपारी कार्यालय बंद करून बाहेर पडले. सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडले असता आत आगीने काही कागदपत्रे, एक टेबल आणि दोन खुर्च्या जळून खाक झाल्याचे लक्षात आले. एका खोलीतील टेबल-खुर्च्यांसह पडदे आणि कागदपत्रांचे गठ्ठे जळून त्याची राख झाली होती. दुसऱ्या खोलीत एका लोखंडी कपाटातील मधल्या कप्प्यातील कागदपत्रांचे गठ्ठे जळाले होते. त्याच कपाटातील इतर कागदपत्रांना आग लागलेली नाही. खिडकीची काच फुटलेल्या अवस्थेत दिसत होती.यावरून कोणीतरी जाणीवपूर्वक खिडकीतून आत प्रवेश करून काही ठराविक कागदपत्रे जाळली असावीत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकानेही घटनेची पाहणी करून आगीचे कारण शोधण्यासाठी काही नमुने ताब्यात घेतले.अधिकाऱ्यांकडून पाहणीघटनेची माहिती मिळताच करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, प्रभारी तहसीलदार स्वप्निल पवार, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी तातडीने करवीर चावडीत जाऊन पाहणी केली. विविध शक्यता गृहीत धरून तपास सुरू केल्याची माहिती पोलिस निरीक्षक कन्हेरकर यांनी दिली.










