देवगड / प्रतिनिधी
महाळुंगे राणेवाडी येथील सौ. शारदा शशिकांत राणे (वय ७२) यांना व त्यांच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी तेथील सुरेश काशिराम राणे (वय ६०) याच्यासह आठ संशयितांविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात २७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी फिर्यादीचे चिऱ्याचे कुंपण पूर्णपणे तोडून त्यांचे सुमारे ३३ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. ही घटना २६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास चेरभरड (ताटली)- महाळुंगे येथे व ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास गावठाण परसव- महाळुंगे येथे घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा राणे या त्यांचे पती शशिकांत राणे (वय ७७), मुलगा बाजीराव राणे (वय ४४) हे तिघे महाळुंगे राणेवाडी येथे एकत्र कुटुंबाने राहतात. त्यांचा मोठा मुलगा संजय हा मुंबई येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतो. त्यांचा लहान मुलगा बाजीराव हा दिव्यांग असल्यामुळे त्याला पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झालेले आहे. हे घरकुल बांधण्यासाठी पती शशिकांत राणे यांनी वडिलोपार्जित वहिवाटेने त्यांच्या वाट्यास आलेली गावठण परसव येथील सर्व्हे नं. १ अ/३०/ २ व सर्व्हे नं. १अ / ३०/ २ अशी एकूण २ गुंठे जागा मुलगा बाजीराव याला संमत्तीने दिली आहे. महाळुंगे ग्रामपंचायतीने त्या संबंधित सर्व कागदपत्रे व प्रत्यक्ष पाहणी करून घरकुल बांधकामास त्यांना परवानगी दिलेली आहे. दरम्यान, २६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास शारदा व त्यांचे पती चेरभरड (ताटली) येथील कलम बागेत असताना तेथे महाळुंगे राणेवाडी येथील प्रकाश काशिराम राणे (वय ६५), महेश प्रकाश राणे (वय ४५), साहिल महेश राणे (वय २०), स्वाती महेश राणे (४३) या संशयितांनी संगनमताने हातात लाकडी काठ्या घेऊन जबरदस्तीने शारदा राणे यांच्या जागेत प्रवेश केला. तेथे पती शशिकांत राणे यांना संशयित प्रकाश राणे यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन व भिती घालून त्यांचे चिऱ्यांचे कुंपण पूर्णपणे तोडून त्यांचे सुमारे ३३ हजाराचे नुकसान केले. तसेच ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास महाळुंगे राणेवाडी येथील सुरेश काशिराम राणे (वय ६०), सुरेखा सुरेश राणे (वय ५५), सुमित सुरेश राणे (वय ३३), प्रकाश राणे, महेश राणे, साहिल राणे, स्वाती राणे, मंगला मंगेश राणे (वय ५५) हे संशयित एकत्रितपणे संगनमताने हातात लाकडी काठ्या घेऊन फिर्यादी शारदा राणे या सर्व्हे नं. १अ/ ३०/२ या जमीन जागेत त्यांच्या राहत्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी जबरदस्तीने आले. संशयितांपैकी मंगला राणे ही शारदा राणे यांच्या अंगावर धावत येऊन ‘तुझा कानफाट’ फोडून टाकीन’, असे म्हणाली. तर संशयित सुरेखा राणे व स्वाती राणे यादेखील शारदा यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेल्या. तसेच संशयित प्रकाश राणे याने पती शशिकांत यांना ‘तीन महिन्यात मारून टाकीन’, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या गावठण परसव सर्व्हे नं. १ अ/३०/२ या जागेत सर्व संशयितांनी अनधिकृत बांधकाम केले. याबाबत दाखल फिर्यादीनुसार सर्व संशयितांविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता कलम १३१, १८९ (२), १९०, १९१ (३), ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ३२९ (१), २३४ (४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण करीत आहेत.











