दापोलीत जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन

दापोली (विशेष प्रतिनिधी) : जागतिक एड्स दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय दापोली आणि दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी भव्य प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. सचिन पाटील आणि दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. गोरिवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
या प्रभातफेरीची सुरुवात उपजिल्हा रुग्णालय दापोली येथून रेड रिबन क्लबच्या नोडल ऑफिसर डॉ. माधुरी साठे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय कवचट यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. विद्यार्थी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागामुळे दापोली शहरात जनजागृतीचा मजबूत संदेश पोहोचला. शहरातील मुख्य रस्त्यांमधून मार्गक्रमण करत प्रभातफेरीची सांगता पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली.
या उपक्रमात दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे डॉ. माधुरी साठे, डॉ. होन, डॉ. जाधव, डॉ. संकेत आसवले तसेच उपजिल्हा रुग्णालयातील परिसेविका श्रीमती एन. वाय. जाधव, अधिपरिचारिका श्रीमती साक्षी हांडे, श्रीमती प्रिया वंडकर, सपना राठोड, अस्मिता जाधव, औषधनिर्माण अधिकारी श्री. पवार, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. गिक्ते, संतोष झिमण यांसह अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनजागृतीला चालना दिली. ही प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी आयसीटीसी समुपदेशक श्री. पांडुरंग हुबाले, सागर बुरटे, रेड रिबन क्लबच्या नोडल ऑफिसर डॉ. माधुरी साठे आणि कॉलेज व्यवस्थापन समिती यांनी विशेष परिश्रम घेतले. जनजागृतीच्या या उपक्रमाद्वारे एचआयव्ही/एड्सबाबत जागरूकता वाढविण्यासाठी समाजाला महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.