संगीतामुळे ताण कमी होऊन मिळते सकारात्मक ऊर्जा – डॉ. संतोष बोराडे

सावंतवाडी । प्रतिनिधी : मानवी जीवन ताणतणावांनी भरलेले आहे आणि हे ताण कमी करण्यासाठी संगीत ऐकणे हा सर्वोत्तम उपचार आहे. संगीत ऐकल्याने माणसाच्या मनावरचा ताण कमी होऊन मानसिक त्रासही दूर होतो, ज्यामुळे जीवनात संगीताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संगीत माणसाला एका वेगळ्या विश्वात रमवते आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते, असे प्रतिपादन प्रसिद्ध म्युझिक थेरपीस्ट डॉ. संतोष बोराडे यांनी सावंतवाडी येथे केले. शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत आणि रोटरी क्लबचे अनंत उचगांवकर यांच्या विशेष प्रयत्नातून दिव्यांग समता सप्ताह निमित्ताने राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे ‘जीवन संगीत गुरूकुल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना डॉ. बोराडे बोलत होते.संगीताची क्षमता: आयुष्य बदलण्याची शक्तीडॉ. संतोष बोराडे यांनी संगीताच्या विविध प्रकारांवर प्रकाश टाकला. आनंद, राग किंवा इतर भावना व्यक्त करण्यासाठी संगीत हे एक उत्तम माध्यम आहे. मन मोकळे करण्यासाठी संगीताचा वापर केल्यास ताणतणाव निश्चितपणे दूर होऊ शकतो आणि माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात आहे, असे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले, “आपली प्रकृती सुदृढ असताना संगीत ऐकणे गरजेचे आहे. यामुळे आपले प्रबोधन होते व आध्यात्मिक शक्ती वाढते आणि स्वतःमधील गुण विकसित करता येतात.” विद्यार्थ्यांसाठी तर संगीत हे त्यांना एक चांगला माणूस म्हणून तयार करण्याची क्षमता देते. त्यांनी श्रोत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले की, “संगीत ऐकताना आपण काय ऐकले पाहिजे?””वाद्य वाजवणे म्हणजे संगीत नाही. आईचे अंगाई गीत, आपण म्हटलेली कविता, आपल्याला आवडलेली गाणी, पारंपरिक लोकगीते हे सुद्धा संगीतच आहे. आपल्या आयुष्यातील संगीत आपण शोधले पाहिजे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.संगीतातून माणसाला चांगल्या-वाईट गोष्टी स्वीकारण्याची शक्ती मिळते आणि तो घाबरून न जाता कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहतो, असेही डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले.’जीवन संगीत गुरुकुल’ कार्यक्रमाचा उद्देशकार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संप्रवी कशाळीकर यांनी ‘जीवन संगीत गुरुकुल’ या कार्यक्रमाचा उद्देश आणि हेतू स्पष्ट केला. त्यांनी विद्यार्थी व पालकांना या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे संचालक प्रा. सतीश बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्यासाठी संगीत कारणीभूत ठरते. त्यामुळे सर्वांनी डॉ. संतोष बोराडे यांच्या या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.उपस्थितांची मांदियाळीया महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे खजिनदार सी. एल. नाईक, संचालक प्रा. सतीश बागवे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीमती संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. डॉ संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट यांच्यासह प्रा. वामन ठाकूर, प्रा.जोसेफ डिसिल्वा, महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे, प्रा. सविता माळगे, प्रा. डाॅ. अजेय कामत, प्रा. रणजीत राऊळ, प्रा. पवन वनवे, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. माया नाईक, प्रा. स्पृहा टोपले, प्रा. निलेश कळगुंटकर, प्रा. राहुल कदम व इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते.विविध शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या संगीत थेरपीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले, तर प्रा. केदार म्हसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दिव्यांग समता सप्ताह निमित्ताने’जीवन संगीत गुरूकुल’ कार्यक्रमाचे आयोजन