मसुरे येथे जागतिक मृदा दिन विविध उपक्रमानी संपन्न
मसुरे | झुंजार पेडणेकर खतांच्या अनियंत्रीत वापराने उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत मात्र बिघडत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुद्धा बिघडते. हे आरोग्य चांगले रहावे यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती जर समृद्ध असेल तर आपलं जीवन चांगले आरोग्यदायी राहिल. मातीला सुरक्षित ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय किर्लोसचे प्रा. प्रसाद ओगले यांनी येथे केले. तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण, कृषि विज्ञान केंद्र किर्लोस व ग्रामपंचायत कार्यालय मर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिन निमित्त तालुका स्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत मर्डे सभागृहात शुक्रवारी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन करून झाला. तालुका कृषि अधिकारी अमोल करंदीकर म्हणाले, निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. शेत जमिनीची माती आपल्याला मोफत मिळाली आहे. परंतु जास्त उत्पादनासाठी अनियंत्रीत प्रमाणात रासायनिक खते व कीटक नाशक आपण वापरु लागलो आहोत. याचे परिणाम म्हणून जमिनीचा ऱ्हास होत आहे. प्रत्येकाचे कर्तव्य आहे कि मातीचे महत्व समजून घ्यावे. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनिल चव्हाण यांनी आरोग्याची काळजी आपण घेतो त्याच प्रमाणे जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे असे आवाहन केले. महाविस्तार एआय ऍप विषयी श्रीम स्नेहल जिकमडे यांनी माहिती दिली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती सरोज परब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री हुसेन आंबर्डेकर, मंडळ कृषी अधिकारी पोईप श्री दशरथ सावंत, उप कृषी अधिकारी श्री सिताराम परब, श्रीमती संचिता फाळके, झुआरी केमिकल्सचे श्रीकृष्ण परब, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सेवक, पोलीस पाटील, सीआरपी, शेतकरी उपस्थित होते. कृषी सेवक राहुल इंगोले यांनी सूत्रसंचलन,
प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी श्री अमोल करंदीकर, आभार मंडळ कृषि अधिकारी श्री दशरथ सावंत यांनी मानले. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्या बद्दल कृषी विभागाने आभार मानले.














