व्यावसाईक रंगभूमीवर चमकणार मसुरेच्या महिला शक्तीचा सुपरहिट प्रयोग
झुंजार पेडणेकर | मसुरे
व्यावसायिक रंगभूमीवर नाटक रंगमंचावर आणणं म्हणजे मोठे शिवधनुष्य! हे शिवधनुष्य पेलण्याचा मूळ मसूरे कावा व सध्या मुंबई येथील दिनु पेडणेकर यांनी निश्चय सुद्धा केला. नवोदित निर्मात्याच्या आग्रही विनंती मुळे या नाटकाचा मुहूर्त सुद्धा निश्चित केला. दोन दिवसावर त्या नाटकाचा मुहूर्त ठरलेला असतानाच त्या नवोदित निर्मात्याने आपल्याला निर्मितीमध्ये पैसे गुंतवणे शक्य होणार नसल्याचे त्यांना सांगितले. नाटकासाठी कलाकार, दिग्दर्शक अशी सगळी जुळवा जुळवा झालेली असतानाच या नाटका बाहेरील अनपेक्षित घडलेल्या ‘ सिन ‘ मुळे आता पुढे काय? असा प्रश्न त्यांना पडला. आपल्या पतीची निराशा पाहून पेडणेकर यांच्या पत्नीने याबाबत माहिती मिळताच आपल्या कुटुंबातील इतर महिला सदस्यांना याची माहिती दिली. आणि एकाच कुटुंबातील पाच महिला एका दृढ निश्चयाने पुढे आल्या व निर्मिती क्षेत्रात प्रथमच उतरल्या. येत्या डिसेंबर अखेरीस हे नाटक व्यावसाईक रंगभूमीवर येत आहे. मसुरे कावावाडी येथील पेडणेकर कुटुंबीयांच्या घरातील या पाच महिलांची अशा पद्धतीने निर्माता म्हणून व्यावसाईक रंगभूमीवर एन्ट्री झाली असून ‘नारी जगात भारी ‘ याचीच प्रचिती त्यांच्या कृतीतून दिसून येते.
मसुरे गावचे सुपुत्र दिनु पेडणेकर हे गेली अनेक वर्ष व्यावसाईक रंगभूमीवर काम करतात. त्यांची स्वतःची निर्मिती संस्था आहे. एका होतकरू निर्मात्यानं नाट्यनिर्माते दिनू पेडणेकर यांची भेट घेऊन एका नाटकाची निर्मिती करण्याची विनंती केली. जुनी, पण धंदा करतील अशी नाटकं सुचवा असं त्याचं म्हणणं होतं. त्यानुसार पेडणेकर यांनी ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे मधुकर तोरडमल यांचं गाजलेलं नाटक सुचवलं. पेडणेकर यांनी नाट्यव्यवस्थापक अशोक मुळे यांच्यामार्फत तोरडमल यांच्या कन्या शर्मिला यांना नाटकाचे हक्क देण्याची विनंती केली. शर्मिला यांनी होकार दिल्यानंतर अतुल तोडणकर, अभिजित चव्हाण, नीता पेंडसे, मानसी नाटेकर हे कलाकार ठरले. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्यावर नाटकाची पुढील जबाबदारी सोपवली गेली.
परंतु मुहुर्ताच्या आधी दोन दिवस निर्मात्यानं, ‘व्यवसायात नुकसान झालं असून आता नाटकाचं काही जमणार नाही’ असं सांगून टाकलं. नाटकाची सर्व जुळवाजुळव झाली असताना, मुहूर्तही ठरला असताना आता अचानक माघार कशी घ्यायची असा प्रश्न पेडणेकर यांना पडला.
पेडणेकर यांची नाराजी पाहून त्यांच्या पत्नी प्रियांका यांनी यामागचं कारण त्यांना विचारलं. नाटकासाठी आलेली अडचण समजताच हे नाटक रंगभूमीवर आणायचंच या जिद्दीनं त्यांच्या पत्नीनं हा विषय त्यांच्या कौटुंबिक ग्रुपमध्ये शेअर केला. कुटुंबातील आणखी चार जणी नाटकावरील प्रेमापोटी निर्मितीसाठी आवश्यक रक्कम उभी करायला तयार झाल्या.
नाट्यनिर्मितीचा कुठलाही अनुभव नसताना प्रियांका यांच्यासह कन्या विजया राणे, वहिनी मधुरा पेडणेकर, मेहुणी योगिता गोवेकर, भाची प्राची पारकर या सगळ्या जणी या नाटकाच्या निर्मात्या बनल्या आहेत.यापैकी दोघी जणी नोकरी करणाऱ्या तर इतर तिघी गृहिणी आहेत. नाटकाचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे. नाटकाची तयारी सध्या जोरात सुरू असून डिसेंबर अखेरीस ते रंगमंचावर येणार आहे. नाटकावरील प्रेमापोटी मसूरेच्या पेडणेकर कुटुंबातील पाच महिला पुढे सरसावल्या आणि पहिल्यांदाच नाट्यनिर्मात्याच्या भूमिकेत प्रवेश कर्त्या झाल्या. प्रथमच अकस्मात पणे व्यावसाईक रंगभूमीवर निर्मात्या म्हणून उभ्या राहिलेल्या या स्त्री शक्तीला प्रेक्षक सुद्धा नाट्यगृहात उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद निश्चितच देतील हीच या निमित्त अपेक्षा !













