सिंधुदुर्गात फक्त खा. नारायण राणे ही एकच शक्ती : ना. नितेश राणे

महायुतीचेच उमेदवार निवडून आणा : ​अपक्षांना निधी मिळणार नाही

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ खा. नारायण राणे नावाचीच शक्ती अस्तित्वात आहे, दुसरी कोणतीही शक्ती येथे चालणार नाही. पक्षादेश डावलून निवडणूक लढवणे ही शिस्तभंग असून, महायुती सोडून निवडून येणाऱ्या अपक्षांना एक रुपयाचाही निधी दिला जाणार नाही, अशा कडक शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधक आणि बंडखोरांना सुनावले. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश सारंग यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
​यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उमेदवार महेश सारंग, शशी सावंत, संतोष राऊळ, पंचायत समितीच्या उमेदवार प्राजक्ता केळुसकर, संध्या हळदणकर, माजी सभापती मंगेश तळवणेकर आदी उपस्थित होते.
​ ​नितेश राणे म्हणाले, ही निवडणूक खासदार नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर विरोधात उभे राहणे चुकीचे आहे. अपक्ष उमेदवार निवडून आला तर तो निधी कुठून आणणार? महायुतीचे सरकार असताना केवळ अधिकृत उमेदवारांनाच हवा तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. अपक्षांना निधी मिळणे अशक्य आहे,” असे सांगत त्यांनी मतदारांना विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले.
​मायकल डिसोजा यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना राणे म्हणाले की, त्यांना पक्षात घेताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी आल्या आल्या पक्षावर वार करण्याची गरज नव्हती. समजावून सांगूनही ते विरोधात उभे राहिले, हे पक्षशिस्तीत बसणारे नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राज्यात महायुतीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे त्यांच्या नावाने कोणी अफवा पसरवत असेल किंवा खोटे फोन करत असेल, तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
​विकासकामांच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कणकवलीचा निधी रोखून धरला होता. त्यांनी जो पक्षपातीपणा केला, त्याचेच फळ आज आम्ही त्यांना देत आहोत. ‘उबाठा’ला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जात आहे.

​निवडणुकीच्या काळात कायदा हातात घेणाऱ्यांना इशारा देताना पालकमंत्री म्हणाले, निवडणूक डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून लढवा. मात्र, कोणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला किंवा कायदा हातात घेतला, तर लक्षात ठेवा मी जिल्ह्यातच आहे. तसे झाल्यास गाठ नितेश राणेशी असेल, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
​महेश सारंग यांना दिलेले मत म्हणजे खा. नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांना दिलेले मत आहे, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना सर्व ताकद भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी करण्याचे आवाहन केले.