लहान मुलाने अचानक स्टेअरिंग ओढल्याने कार गटारात
वैभववाडी प्रतिनिधी :
करुळ येथील पोलीस चेक नाक्यानजीक कारचा अपघात झाला. चालकाच्या शेजारी बसलेल्या लहान मुलाने अचानक कारचे स्टेअरिंग फिरवल्याने कार गटारात धडकली. अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात कारमधील प्रवासी बालबाल बचावले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही.
सदर कार कणकवलीहून कोल्हापूरकडे जात होती. करूळ घाट मार्गे जात असताना करूळ चेक नाका पासून 300 मीटर अंतरावर पुढे बसलेल्या मुलाने स्टेअरिंग अचानक ओढले. दरम्यान गाडी रस्त्याबाहेरील गटारात धडकली. या अपघाताची माहिती मिळताच चेक नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कारमधील सर्व प्रवाशांची त्यांनी विचारपूस केली. प्रवाशांनी आपण दुसऱ्या गाडीने जात असल्याचे सांगितले. कारचालकाने आपली कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.











