रापण संघाच्या मागण्यांना योग्य न्याय देऊ : पालकमंत्री नितेश राणे

कुणकेश्वर – पारंपारिक मच्छीमार व रापण संघांच्या मागण्यांना योग्य न्याय देण्यासाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सर्व संबंधितांशी चर्चा करून यशस्वी तोडगा काढू, असे आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दूरध्वनीद्वारे रापण संघांना दिले आहे.

अलीकडेच रापण संघाने कुणकेश्वर येथे बैठक घेऊन हिवाळी अधिवेशनात मदतीचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांत बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघाने दिला होता.

यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार रापण संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेमध्ये दिनेश धुवाळी, विश्वास भुजबळ तसेच पारंपारिक मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.

चर्चेनंतर आम्ही समाधान व्यक्त करत असून पालकमंत्री नितेश राणे न्याय देणार याची खात्री वाटत असल्याचे रापण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजपाच्या शिष्टमंडळामध्ये बाळ खडपे, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, मच्छिमार नेते ज्ञानेश्वर खवळे, भाजपा उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, माजी नगरसेवक बापू जुवाटकर आणि कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हाणकर यांचा समावेश होता.