शेतकरी बागायतदार मेळाव्यात मनीष दळवी यांचा सत्कार
सोसायटीच्या नव्या इमारतीसाठी तातडीने मदत करण्याचे आश्वासन
सावंतवाडी । प्रतिनिधी : कृषी क्षेत्राच्या विकासाला सहकाराच्या माध्यमातून बळकटी देणे गरजेचे आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कायम सहकार्य असेल. तसेच, कोलझर पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँक पूर्ण ताकतीने पाठबळ देईल, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी शनिवारी (ता. ७) येथे दिली. कोलझर वि. का. स. सह सेवा सोसायटीतर्फे आयोजित शेतकरी बागायतदार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर झालेल्या या मेळाव्यास पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जमीन विकू नका, आधुनिक शेती करा
यावेळी बोलताना श्री. दळवी म्हणाले, “आगामी काळात शेती क्षेत्रातूनच खरी प्रगती होणार आहे. तुमच्याकडे असलेली जमीन हे खरे सोने आहे, ते विकू नका. आधुनिक पद्धतीने शेती बागायती करून त्यातून आर्थिक उन्नती साधणे शक्य आहे. कोलझर पंचक्रोशीत यासाठी आवश्यक असलेली सर्वाधिक क्षमता आणि संपन्नता आहे.” सहकाराच्या माध्यमातून शेती बागायतीला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने आवश्यक ती सगळी मदत केली जाईल. यात सोसायटीची भूमिका महत्त्वाची असेल, असे त्यांनी नमूद केले.
नव्या इमारतीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करा
सोसायटीच्या वतीने नव्या इमारतीसाठी जिल्हा बँकेकडून आवश्यक ती सगळी मदत तातडीने करू. त्यासाठी सोसायटीने प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले. केवळ शेती-बागायती आणि सहकार याच्याही पलीकडे जाऊन या पंचक्रोशीतील सगळे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बँक पूर्ण ताकतीने पाठबळ देईल. पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करत या भागाच्या उन्नतीसाठी शक्य तितके प्रयत्न करण्याची ग्वाही श्री. दळवी यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री. दळवी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, जिल्हा बँकेचे संचालक गणपत देसाई, सोसायटीचे अध्यक्ष सुदेश देसाई, उद्यान विद्या महाविद्यालयाचे तज्ञ मार्गदर्शक डॉ. एम. एस. शेडगे, डॉ. आर. आर. राठोड, डॉ. वाय. सी. मुठाळ, जिल्हा बँक विकास अधिकारी संजय ठाकूर, सोसायटीचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात सहकार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तसेच उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. विजय दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच सोसायटीचे माजी अध्यक्ष रा. पु. सावंत, प्रवीण परब, विकास सावंत आदींसह ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई यांचाही सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बँकेचे संचालक श्री. गणपत देसाई यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात सोसायटी अध्यक्ष सुदेश देसाई यांनी सोसायटीच्या आणि परिसराच्या विकासासाठी जिल्हा बँकेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. उद्यान विद्या महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी नारळ-सुपारीच्या बागायतीला अधिक आधुनिक रूप देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रवीण परब यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांना सोसायटीच्या वतीने सुपारीची रोपे वाटण्यात आली.
नव्या इमारतीला अल्प व्याजदरात अर्थसहाय्य
सोसायटीची इमारत जुनी झाली असून, स्व-उत्पन्न वाढवण्यासाठी नवी इमारत बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा बँकेकडून सहकार्य करण्याची मागणी सोसायटीचे अध्यक्ष आणि संचालकांनी श्री. दळवी यांच्याकडे केली. या मागणीला प्रतिसाद देत श्री. दळवी यांनी नव्या इमारतीसाठी जिल्हा बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात आर्थिक पाठबळ देण्याची ग्वाही दिली. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.













