TWJ कंपनीविरोधात गुंतवणूकदारांचा संताप उसळला; चिपळूण पोलिस स्थानकात ठिय्या, आत्मदहनाचा इशारा

चिपळूण: 
TWJ कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपांनंतर आज चिपळूण पोलिस स्थानकात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. दोनशेहून अधिक गुंतवणूकदारांनी पोलिस स्थानकात ठिय्या देत अधिकाऱ्यांना अक्षरशः घेराव घातला. कंपनीचे संचालक समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीतून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून करण्यात आला आहे.
गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की, त्यांनी सर्व पुरावे पोलिसांना सादर करूनही आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. राज्यातील पोलिसांचे समीर नार्वेकर आणि त्याच्या पत्नीला उघडपणे पाठीशी घालण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात अकरा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना फसवण्यात आल्यानंतरही आरोपींना संरक्षण दिले जात असल्याचा थेट आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती पालकमंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली असूनही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे संताप आणखी तीव्र झाला आहे. समीर नार्वेकर आणि त्याच्या पत्नीला 31 डिसेंबरपर्यंत अटक न झाल्यास आम्ही पोलिस स्थानकाबाहेर आत्मदहन करू, असा इशारा आक्रमक गुंतवणूकदारांनी दिला. पोलिस स्थानकाच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून गुंतवणूकदारांचा आंदोलनात्मक गोंधळ सुरू आहे. न्याय न मिळाल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याची चेतावणी देत गुंतवणूकदारांनी प्रशासनाला धडा शिकवण्याची भाषा केली आहे.