गिर्ये येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी कलशाचे दर्शन
देवगड / प्रतिनिधी :संविधानातील खरा देश हिताचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. भारतीय संविधान या देशातील शेवटच्या माणसाचे प्रतिनिधित्व करते. या संविधानाने राष्ट्राला चारित्र्य दिलं. हे संविधान भारतीय नागरिकांच्या हक्काचा आणि देशाप्रती कराव्या लागणाऱ्या कर्तव्याचा ग्रंथ आहे. या खंडप्राय देशाचा कारभार याच संविधानानुसार एवढी वर्षे निरंतर व सुरळीत सुरू राहिला ही गोष्ट निःसंशय अभिमानास्पद आहे. यासाठीच भारतीय संविधानाचा जागर आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकर चळवळीचे अभ्यासक डि. के. पडेलकर यांनी केले.
तालुक्यातील गिर्ये बुद्ध विहार येथे देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ तसेच गिर्ये बौद्धजन विकास मंडळ मुंबई/ ग्रामीण आणि पंचशील महिला मंडळ गिर्ये यांचे संयुक्त विद्यमाने ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत प्रमुख मार्गदर्शन श्री. पडेलकर यांनी केले. विचारमंचावर उत्तम कांबळे, अनिल पुरळकर, किशोर कांबळे, संजय कांबळे, सुनील कांबळे, संतोष गिरकर, दिलीप गिरकर,सिद्धार्थ गिरकर, लता गिरकर, सुनील गिरकर , चंद्रकांत गिरकर, सचिन गिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. पडेलकर यांनी मार्गदर्शन करताना, सर्व जगाचे कल्याण बाबासाहेबांनी धम्मात पाहिले. बुद्ध धम्माची संकल्पना ही बाबासाहेबांच्या प्रतिभेची एक अमूल्य देणगी आहे. केवळ जयजयकार केल्याने बाबासाहेबांची उंची वाढणार नाही तर बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी उभारलेली चळवळ पुढे नेल्याने बाबासाहेबांची उंची वाढणार आहे. गिर्ये बुद्ध विहार येथे जतन करून ठेवण्यात आलेला बाबासाहेबांचा अस्थिकलश हा आमच्यासाठी असीम श्रद्धा आणि विलक्षण आस्थेचा विषय आहे.आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत ऊर्जास्त्रोत आहे. याचं पावित्र्य सर्वांनी जपलं पाहिजे. या माध्यमातून समाज मनाला विधायक सवयींकडे वळवलं पाहिजे असे प्रतिपादन श्री. पडेलकर यांनी केले. अभिवादन सभेसाठी बौध्दजन सेवा संघाच्या वतीने प्रारंभी बौध्दजन सेवा संघाच्या सर्व गाव शाखांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी कलशाचे दर्शन शांतपणे व गांभीर्यपूर्वक वातावरणात घेतले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सेवा संघाच्या महिला बौद्धाचार्य अर्पिता साळुंखे,संजीवनी गिरकर यांनी बुद्ध पूजा पाठ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सचिन गिरकर यांनी केले. यावेळी विजयदुर्ग पोलीस निरीक्षक श्री. कातीवले, विजय कोंडकर,अनिल पुरळकर, संजीवनी गिरकर,उदय पेंढारकर, जयवंत वाडेकर, सुरेश साळुंखे, लता गिरकर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला अध्यक्ष अर्पिता साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन सचिव मनोहर सावंत यांनी केले तर आभार सचिन गिरकर यांनी मांडले.













