मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्याला झोडपले ,दोन घरांसह पडवीचे दीड लाखांचे नुकसान

मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्याला झोडपले
दोन घरांसह पडवीचे दीड लाखांचे नुकसान
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यात चराठे येथे घरावर झाड पडून नुकसान झाले तर दांडेली येथे घराचे लाकडी वासे मोडून पडवीचे नुकसान झाले. दोन्ही घटनाचा पंचनामा महसुल कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला असून तशी नोंद येथील तहसिल कार्यालयात झाली आहे.
सावंतवाडी तालुक्यात दोन दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दिवसभर व रात्रीही धुंवाधार कोसळणाऱ्या पावसाने नदी, नाल्यांना पुर आले. तालुक्यात ग्रामीण भागातील सखल भागात असणाऱ्या पुलांवरून पाणी वाहू लागल्याने वाहतुक ठप्प झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये होडावडा पुल नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला होता.
दरम्यान, मंगळवारी रात्री चराठे येथील अनंत परशुराम परब यांच्या घरावर झाड शेजारील आंब्याचे झाड उन्मळून पडल्याने त्यांचे घराचे नुकसान झाले तर दांडेली येथील काशिनाथ तुकाराम आरोसकर ह्यांच्या घराच्या पडवीचे लाकडी वासे अतिवृष्टीमुळे मोडून ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. दोन्ही घटनेचा पंचनामा तेथील महसुल कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला असून तशी नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.
तालुक्यातील सर्व घडामोडींवर तहसीलदार श्रीधर पाटील हे जातीने लक्ष ठेऊन आहेत. मंगळवारी रात्रीही त्यांनी तेरेखोल नदी तसेच बांदा परिसराची पाहणी केली. ज्या-ज्या ठिकाणी धोक्याची घंटा आहे तेथील यंत्रणेशी त्यांनी अलर्ट राहण्याची सुचना केली आहे.