रत्नागिरीत मटका-जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; एक जण ताब्यात

रत्नागिरी :

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका-जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) सोमवारी संध्याकाळी छापा टाकून एका इसमाला ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळील पायऱ्यांवर एक व्यक्ती लोकांकडून पैसे स्वीकारून मटका-जुगार चालवत असल्याचे LCB पथकाला कळले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 18:55 वाजता धाड टाकली.

छाप्यात त्या व्यक्तीकडे पावती पुस्तकावर मुंबई मटका आकडे लिहिलेली नोंद व समोर ठेवलेली रोख रक्कम आढळून आली. त्याची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव मेघशाम चंद्रकांत वाचणकर (वय 51, रा. मर्समेंट समोर, बाजारपेठ, रत्नागिरी) असे सांगितले.

पोलिसांनी आरोपीकडून ₹1,550/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 453/2025, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई LCB पथकातील सुभाष भांगे, बाळू पालकर, विवक्रम पाटील, अनमोल कदम आणि सत्यजीत दरेकर यांनी संयुक्तरीत्या केली.