सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. वेदा प्रवीण राऊळ हिने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. ६ वी ते ८ वी या गटातून ‘सौर ऊर्जा एक उज्वल भविष्य’ (Solar Energy: A Bright Future) या विषयावरील निबंध स्पर्धेत वेदाने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उंचावले आहे.
शिक्षण विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी आणि विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल, निरवडे येथे नुकतेच ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने आयोजित विविध स्पर्धांमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या प्रदर्शनातील निबंध स्पर्धेत वेदा राऊळ हिने अत्यंत प्रभावीपणे ‘सौर ऊर्जा एक उज्वल भविष्य’ या विषयावर लेखन करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रथम येण्याचा मान मिळवला. तिच्या या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे आता वेदाची निवड थेट जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी झाली आहे.
वेदाने मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच, आगामी जिल्हास्तरीय फेरीसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.












