धामणदेवी ग्रा.पं.मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप

चिपळूण  : खेड तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायतीत वस्तू खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर यांनी केला आहे. ग्रामस्थांनी रितसर गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
श्री. पेवेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर यांसह इतर वस्तू पोर्टलवरून खरेदी केल्या. या प्रक्रियेत अनेक गंभीर अनियमितता समोर आली असून ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आली आहे. या संदर्भातील बिलांमध्ये नमूद नसलेल्या वस्तूप्रत्यक्ष खरेदी करण्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय गावातील विकासकामांमध्येही मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. धामणदेवी ग्रामपंचायतीत झालेले खर्च व नोंदी यांच्यात मोठा फरक असल्याचे नमूद केले आहे. ग्रामपंचायतीत तब्बल ४० पेक्षा अधिक विकासकामे झाल्याचे दाखवले जात असले तरी अधिकृत मोजमाप वह्यांमध्ये अवघ्या २४ कामांचीच नोंद करण्यात आली आहे. उर्वरित कामांची मोजमाप नोंद नसल्याने आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी श्री. पेवेकर यांनी केली आहे.