शिरगाव (प्रतिनिधी) देवगड येथे ९ व १० डिसेंबर रोजी पार पडलेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात पेंढरी विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम ठेवत बहुविभागीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय अव्वलता मिळवली.
दिव्यांग विद्यार्थी विभागात इयत्ता ९ वीतील कु. चैतन्य अजय गिरकर याच्या ‘दिव्यांगांची कुऱ्हाड’ या अभिनव प्रतिकृतीस प्रथम क्रमांक मिळाला. प्रयोगशाळा परिचर गटात श्री. संतोष पुनाजी तिर्लॉटकर यांनी सादर केलेल्या स्पेसीमेन प्रिझर्व्हेशन या प्रतिकृतीलाही प्रथम क्रमांक मिळून शाळेचा गौरव वाढविला.
विद्यार्थी प्रतिकृती प्राथमिक विभागात कु. पूर्वा प्रशांत कोळसुमकर आणि कु. आर्या दिनेश तिर्लॉटकर यांच्या ‘वॉटर अलार्म’ या प्रतिकृतीसह एकत्रित तीन प्रतिकृतींची जिल्हा स्तरीय प्रदर्शनासाठी (दि. १६, १७, १८ डिसेंबर) निवड झाली आहे.
तसेच प्राथमिक विभागात कु. यश वैभव घाडी याच्या ‘व्हॅक्यूम क्लिनर’ या प्रतिकृतीस तृतीय क्रमांक मिळाला. पदवीधर शिक्षक विभागात श्री. संतोष राणे यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात प्रथम क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या सर्व विजयी स्पर्धकांच्या यशामागे मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक श्री. सत्यपाल लाडगांवकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि प्रभावी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. विद्यार्थी, शिक्षक आणि परिचर गटाचा संयुक्त प्रयत्न शाळेच्या शैक्षणिक–वैज्ञानिक प्रगतीची भक्कम पावती ठरला आहे.जिल्हा स्तरीय स्पर्धेतही पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय व जि. पं. प्राथमिक शाळा संघांकडून तितक्याच दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या यशस्वी विध्यार्थीचे ग्रामविकास मंडळ अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ तसेच पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.












