करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सौर ऊर्जा जनजागृती अभियान स्पर्धेत यश
शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलीक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाने सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ स्पर्धेत राज्यस्तरीय चौथा क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश संपादन केले असून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विरार येथील विवा कॉलेज यांच्या सहकार्याने ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत २१ व २२ जून रोजी राबविण्यात आला होता.
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शिरगावच्या कर्ले महाविद्यालयाने राज्यस्तरीय चौथा क्रमांक, कोकण विभागात द्वितीय क्रमांक, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून तिहेरी यश मिळवले आहे.
१०० टक्के सौर ऊर्जा जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल राज्यातील निवडक ३३ महाविद्यालयांच्या यादीत महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे.
याच उपक्रमांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी गुणाजी चौकेकर हिने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्रा. अक्षता मोंडकर यांना प्रा. कोमल पाटील, प्रा. आशय सावंत, सुरेश सुतार, नीलम नाईक, सागर करडे व सुभाष खरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल प्रा. अक्षता मोंडकर यांचे शिरगाव पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, संस्थेचे पदाधिकारी व संचालक, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम व सुधीर साटम, प्राचार्य समीर तारी, शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. आत्तार तसेच पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे यांनी अभिनंदन केले.











