कळझोंडी-गणेशवाडी येथे भरदिवसा घरफोडी; 1 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला

रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील कळझोंडी-गणेशवाडी येथील घर फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना मंगळवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 4 वा. कालावधीत घडली आहे.

याबाबत रामचंद्र झराजी निंबरे (46,रा.कळझोंडी-गणेशवाडी,रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,मंगळवारी निंबरे कुटुंबिय घर बंद करुन बाहेर गेले होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची आतील कडी कोणत्यातरी हत्याराने बाहेरुन उचकटून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याची माळ,पुतळी,अंगठी, चांदीची सर आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 12 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. सायंकाळी 4 वा.सुमारास निंबरे कुटुंबिय घरी परतल्यावर त्यांना आपल्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.तसेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे समजले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.