विज्ञानाकडे डोळसपणे पहा : आ. दीपक केसरकर

​सावंतवाडीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार शुभारंभ

​मान्यवरांकडून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे कौतुक

​सावंतवाडी । प्रतिनिधी : विज्ञानामुळे मानवी जीवन सुसह्य झाले आहे. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाकडे केवळ एक स्पर्धा म्हणून न पाहता, विज्ञानाकडे ‘डोळस’ पद्धतीने पाहायला हवे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाची प्रगती साधावी, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी येथे केले.

​सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार केसरकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे आमदार दीपक केसरकर यांनी केवळ पाहुणे म्हणून उपस्थिती न लावता, प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला वैयक्तिक भेट दिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग आणि कलाकृतींची त्यांनी बारकाईने पाहणी केली. प्रयोगांमागची संकल्पना समजून घेताना केसरकर स्वतः एका जिज्ञासू विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या आपुलकीच्या संवादामुळे बालवैज्ञानिकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. “हे विज्ञान केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित न ठेवता त्याचा दैनंदिन जीवनात वापर करा,” असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

​शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
​या सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, उपशिक्षणाधिकारी अप्सरा बेगम आवटी, गटशिक्षणाधिकारी सविता परब, ए. एम. वडाळ, विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत

ठाकर, आणि राजाराम मर्गज यांचा समावेश होता.
​तसेच विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कातकर, बी. एस. कांबळे, शिवाजी गाबीत, मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका संध्या कुमठेकर, डॉ. उदयसिंग पाटील, प्रसाद ओगले आणि गणेश मर्गज आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अनिता सडवेलकर गावडे यांनी केले.

​जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
​या जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विविध शाळांमधून शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध प्रकल्प शाश्वत विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलाग्रीस हायस्कूलच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.