महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाने जिंकली “उमंग राष्ट्रीय ट्रॉफी २०२५”

सिंधुदुर्गच्या स्मिता गावडे हिने सांभाळली कर्णधारपदाची यशस्वी धुरा..

वेंगुर्ले : दाजी नाईक
भोपाळ येथे झालेल्या दिव्यांगाच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघानें विजय मिळवत ‘उमंग राष्ट्रीय ट्रॉफी २०२५’ वर आपले नाव कोरले. संघाचे कर्णधारपद सिंधुदुर्ग चीं स्मिता गावडे हिने सांभाळले. विजेत्या संघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

मध्यप्रदेश भोपाळ येथे उमंग गौरवदीप वेलफेअर सोसायटी तर्फे उमंग राष्ट्रीय दिव्यांग महिला क्रिकेट कप २०२५ चे आयोजन ओल्ड चैम्पियन मैदानावर करण्यात आले होते. येथे दिव्यांग महिला राष्ट्रीय क्रिकेट सामने पार पडले. यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आणि झारखंड या चार राज्यांचे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात झारखंडला पराभूत करून महाराष्ट्र संघाने दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता सुनिल गावडे यांनी संघाचे उत्कृष्ट असे नेतृत्व केले. या संघात सिंधुदुर्गच्या तीन दिव्यांग महिलां खेळाडूंचा समावेश होता. कर्णधार – स्मिता सुनिल गावडे-वेंगुर्ला, शिल्पा गाविंद गांवकर मालवण-आचरा, दिक्षा दिनेश तेली,देवगड.या तिघींनी आज सिद्ध करुन दाखवले कीं आम्ही दिव्यांग असूनही दिव्यांगत्वावर मात करून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात अग्रेसर आहोत. या दिव्यांग महिला महाराष्ट्र राज्यासाठी खेळल्या आणि चॅम्पियन ट्रॉफी महाराष्ट्रात घेऊन आल्या.

दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया चे संस्थापक हरून रशीद, महाराष्ट्र अध्यक्षा भाग्यश्री वर्तक, पश्चिम भारत प्रमुख रुपाली पाटील, संघ मैंनेजर सोनाली शिंदे, संघाचे कोच रमेश सरतापे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेने जिल्ह्यातील दिव्यांग महिलांना सर्वप्रथम क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण दिलें व त्यांचा सराव करून घेऊन त्यां खेळाडूंना राज्यस्तरीय व राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी दिली. साहस संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील दिव्यांग महिला खेळाडूंना एकत्र करून महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघ तयार केला. या महिला संघाने अनेक राष्ट्रीय सामन्यात चॅम्पियनशिप मिळवले. या संघात निवड झालेल्या सिंधुदुर्ग च्या खेळाडूंनी स्वकर्तृत्वाने या संधीचे सोने केले. कर्णधार स्मिता गावडे हिच्या नेतृत्वात शिल्पा गावकर, दिक्षा तेली, व इतर खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सामना जिंकला. या आमच्या दिव्यांग भगिनींच्या साहसाला, धैर्याला साहस चा सलाम लवकरच साहस संस्था या संघाचे भव्य दिव्य सन्मान सोहळाचे आयोजन करणार आहे आणि नविन दिव्यांग खेळाडूंना अनेक क्रीडा प्रकारात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. असे रूपाली पाटील यांनी सांगितले.