कासार्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी फुंकला एल्गार ; कस्तुरी पाताडे हिला श्रध्दांजली वाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले
तरेळे ( गुरू सावंत)
कणकवली तालुक्यातील कासार्डे आनंदनगर येथील कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिच्यावर चुकीच्या पध्दतीने शस्त्रक्रिया केल्यामुळेच मृत्यू झाला. त्या घटनेच्या निषेधार्थ कासार्डे तिठा येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येत मृत कस्तुरी पाताडे हिला श्रध्दांजली वाहिली. यावेळी कस्तुरी पाताडे हिला श्रध्दांजली वाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. कस्तुरीला परत आणून द्या , अख्खा गाव पोलीसांचे गुन्हे घ्यायला तयार असल्याचा इशारा , यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला आहे.
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील युवती कु. कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिच्या मृत्यूनंतर बुधवारी सकाळी कासार्डे तिठ्ठा येथे समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, माजी उपसभापती प्रकाश पारकर ,कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, निवृत्त पोलिस अधिकारी सुर्यकांत तळेकर, माजी सरपंच संतोष पारकर, रविंद्र पाताडे , संजय पाताडे व पंचक्रोशीतील सरपंच , उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी जि.प.सदस्य संजय देसाई म्हणाले , डॉ. नागवेकर याच्या अनेक कोर्ट केस आहेत , त्या आम्ही बाहेर काढणार आहोत. एखादया गाठीचे ऑपरेशन केल्यानंतर अनेक आजार निर्माण होतात का? आणि गंभीर आजार असेल तर कोल्हापूरला पाठवणे म्हणजे डॉक्टरची चूक आहे.डॉ. अनंत नागवेकर याचा आदर आहे, मात्र डॉक्टर संघटनेने डॉ. मयुर नागवेकर याचा इतिहास पाहावा . जिल्हाधिका-यांना जे निवेदन दिले आहे , याप्रमाणेच आम्हीही जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक व अन्य ठिकाणी निवेदन देणार आहोत.
माजी उपसभापती प्रकाश पारकर म्हणाले , कस्तुरी पाताडे या युवतीचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानतंर कोल्हापूर येथे पाठवून मुत्यु होऊनही डॉ. नागवेकर चूक मान्य करीत नाहीत. तरीही त्याबद्दल मार्ग काढावा म्हणून आम्ही संवाद करण्यासाठी गेलो, मात्र डॉक्टरांचे सहकार्य मिळाले नाही.सहकार्य न मिळाल्यामुळे जनसमुदाय जमला होता. त्यात कासार्डेसह तालुक्यातील ज्याचा रोष होता, त्या लोकांनी रूग्णाकडून जास्त पैसे घेतात या रोषापोटी ही घटना घडली आहे. डॉ. परूळेकर आमच्यावर खंडणीचा आरोप करतात, ही चुकीची बाब आहे. जर डॉक्टराना पैसे कमी पडत असतील तर कासार्डेवासिय मदत करतील , परंतु असे घाणेरडे आरोप घृणास्पद पध्दतीने करु नये. कारण आज जे डॉक्टर बोलत आहेत , त्यानी आमची गेलेली मुलगी परत करा आणि तुम्ही जे जे गुन्हे दाखल कराल त्यासाठी कासार्डेसह दशक्रोशी तयार आहे. आमच्या मुलीचा जीव गेला तरी चुकीचे आरोप केले जातात. हे दुदैवी आहे. डॉक्टराना आम्ही देव मानतो आज आम्हाला डॉक्टरविषयी अशी प्रतिक्रिया देताना खंत वाटते. डॉक्टर असोसिएनने चुकीच्या पध्दतीने नागरीकांना वेठीस धरत आहेत. मुत्यु होऊनही नागरीकांनी आवाज उठवायचा नाही अशा प्रकारच्या वृत्तीस आळा घातल्याशिवाय कासार्डेवासियसह तालुका गप्प बसणार नाहीत. याबाबत पालकमंत्री,जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकाना निवेदन देणार आहोत.
माजी सभापती दिलीप तळेकर म्हणाले , मृत कस्तुरीवर झालेला अन्याय हा एकट्या मुलीवर झालेला अन्याय नाही. आजूबाजूच्या गावातील आजपर्यंत झालेला अन्याय झालेल्या सर्वानीच धाव घेतल्याने दवाखान्याबाबत दुदैवी घटना घडली आहे.आज सर्वच डॉक्टरांकडून जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन गुन्हे दाखल करा , अशी मागणी केली जाते. परंतु मी असे म्हणेन गुन्हे दाखल करायचे असतील तर संपूर्ण गावासह तालुक्यावर करा. जो लढा लढायचा आहे तो लढण्यास तयार आहोत.आज त्या मुलीचा जीव गेला आहे. डॉक्टरनी दिलगिरी व्यक्त केली पाहीजे होती.ती कुणीही केली नाही. लोकांवर खंडणी,पूर्वनियोजित कट व विविध आजार असल्याने सांगितले जात आहेत, हे सर्वसामान्य जनतेला दिशाभूल करण्यासाठी आहे. डॉक्टरांना जरातरी समाजाबद्दल संवेदना असतील तर त्यांनी जिल्ह्यात उमटणा-या प्रतिक्रिया काय आहेत याची माहिती घ्यावी , असे आवाहन त्यांनी केले.

सूर्यकांत तळेकर म्हणाले, कस्तुरीला कोल्हापूरला नेताना डॉक्टरांनी कोणताही मोबदला न घेता रूग्णवाहीका दिली , येथेच शंका निर्माण होत आहे. डॉ. नागवेकर हॉस्पिटल मध्ये आजपर्यंत कोणत्याही रूग्णाकडून पहिले पैसे भरल्याशिवाय उपचार केलेले नाहीत तर काहींचे मृतदेह देखील दिलेले नाहीत. अनेकांना दागिणे विकून उपचार करावा लागल्याची उदाहरणे आहेत.
सरपंच निशा नकाशे म्हणाल्या , कस्तुरी पाताडे हीचे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाला. या आक्रोशापोटी कासार्डेसह तालुक्यातील नागरीक एकत्र येत प्रत्येकाने काहीना काही सोसले आहे, त्याची प्रतिक्रिया दवाखान्यात उमटली आहे. सुरुवातीला डॉक्टर मॅडम यानी चप्पल काढल्याने ही घटना पुढे घडली. आज त्याना हे कृत्य अशोभनीय आहे.याला डॉक्टर संघटना साथ देते हे खपवून घेणार नाही. उपस्थितांनी श्रध्दांजली वाहण्यात आली असून डॉक्टरचा निषेध म्हणून परीसरात डिजिटल बॅनर लावून निषेध केला आहे.
यावेळी मान्यवरांनी श्रध्दांजली वाहताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कस्तुरी पाताडे हिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कस्तुरीला परत आणून द्या , अख्खा गाव पोलीसांचे गुन्हे घ्यायला तयार आहे . अशा परिस्थित आम्हाला आमच्या मुलीचा जीव महत्त्वाचा आहे. त्याला वेगळ्या वळणार नेण्याचा प्रयत्न डॉक्टर संघटनांकडून होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.












