मालवणात मुसळधार पावसाचा कहर

 

शहरातील बसस्थानक मार्गवरील रस्ते पाण्याखाली

देऊळवाडा येथे घरावर झाड कोसळून नुकसान ; सुकळवाड व अन्य भागातही नुकसान

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर परिसरात गुरुवारी मुसळधार पावसाने कहर माजवला. यामुळे रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. शहर देऊळवाडा येथे नागू अंबाजी वळकर हे मोलमजुरी करून राहत असलेल्या कुटुंबाच्या झोपडी वजा घरात झाड कोसळले. यात घरातील साहित्य यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. सुकळवाड येथे लवू लक्ष्मण चिंदरकर यांच्या घराचे पडझडीमुळे नुकसान झाले. याबाबत मालवण महसूल प्रशासनाकडे नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान शहर परिसर रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बसस्थानक समोरील मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुकाने व घरातही पाणी शिरले. याबाबत माहिती स्थानिक रहिवाशी दीपेश नार्वेकर यांनी दिली आहे. मुसळधार पावसाने जलमय स्थिती निर्माण झाली होती.