वेंगुर्ले येथे पोलीस पाटील दिन उत्साहात साजरा..
वेंगुर्ले : दाजी नाईक
प्रशासन व गावाची जोडणारी नाळ म्हणजेच पोलीस पाटील. प्रशासनाचे ते कान, नाक आणि डोळे आहेत. त्यांच्या विश्वासावर प्रशासनाचे चाक पुढे चालते. गावातील शांतता, सुव्यवस्था ही पोलीस पाटलांच्या योगदाना मुळेच राखली जाते. गावातील प्रत्येक गंभीर घटनेवेळी प्रथम हजर असतो तो म्हणजे पोलीस पाटील. पूर, आग अपघात वा नैसर्गिक आपत्तीवेळी लोकांना मदत पोलीस पाटील करतो. समाजातील खरा नायक पोलीस पाटील आहे. पोलीस प्रशासनातील मनुष्यबळाची मर्यादेच्या पार्श्वभूमीवर आम्हाला पोलीस पाटलांची जी मदत मिळते ती अविश्वसनीय आहे, असे गौरवोद्गार वेंगुर्ले चे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्लेतर्फे सावंतवाडी उपविभाग (प्रांत) पोलीस पाटील संघटनेच्या संकल्पनेतून वेंगुर्ले रामघाट येथील सातेरी मंगल कार्यालय येथे पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. ओतारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, आरवली येथील वेतोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत राय, प्रांत पोलीस पाटील विभाग अध्यक्षा जागृती गावडे, उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, आरवली सरपंच समीर कांबळी, सावंतवाडी पोलीस पाटील संघटना तालुका उपाध्यक्ष नितीन नाईक, दोडमार्ग तालुका संघटक सचिन सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष तानाजी सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मधुसुदन मेस्त्री, प्रतीक्षा मुंडये, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर आदि उपस्थित होते. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले. पोलीस पाटलांनी एकत्र येत पोलीस पाटील दिन साजरा करणे ही अलौकीक गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस पाटलांच्या दाखल्याला फार महत्त्व : वासुदेव नाईक
गटविकास अधिकारी वासुदेव नाईक म्हणाले, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्याची जबाबदारी पोलीस पाटीलांवर असते. ही जबाबदारी ते सामाजिक भावनेतून पार पाडतात. गावातील खडानखडा प्रत्येक कुटुंबाची तेथील वादाचा, आणि तो वाद कशा पद्धतीने मिटेल याची कल्पना पोलीस पाटलालाच असते. खूप चांगल्या पद्धतीने पोलीस पाटील समन्वयकाची भूमिका पार पाडत असतो. विविध कामांसाठी लागणारे पोलीस पाटलांचे दाखले म्हणजे फार महत्त्वाचे आहेत. गावातील जनतेच्या सेवेसाठी तत्काळ उपलब्ध होणाऱ्या पोलीस पाटलांचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे.
यावेळी वेतोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत राय, सरपंच नीलेश चमणकर, निवृत्त पोलीस – पाटील लवू तुळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजगावच्या पोलीस पाटील – निकिता पोखरे यांनी, सूत्रसंचालन तुळस पलतडच्या पोलीस पाटील चारूता परब यांनी तर आभार पाल गावच्या पोलीस पाटील ऋतिका नाईक यांनी मानले.












