आंबोली :
आंबोली वनपरिक्षेत्रातील चौकुळ केगदवाडी येथे बेकायदेशीर शिकार करणाऱ्या दोन जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गुरुवारी मध्यरात्री गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून एक मृत पिसव (Mouse Deer), एक बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निकरवाई करण्यात आली.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी चौकुळ केगदवाडी रस्त्यावर दोन व्यक्ती संशयास्पद रित्या फिरताना आढळल्या. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून त्यांची कसून तपासणी केली असता, त्यांच्याकडे एक सिंगल नळीची बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि एक मृत पिसव आढळून आला. यासोबतच त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल आणि एक टीव्हीएस कंपनीची स्कूटर वनविभागाने जप्त केली.
याप्रकरणी तुषार विजय गुंजाळ (वय ३८, रा. ऊपवडे, ता. कुडाळ) आणि परशुराम संजय राऊळ (वय २७, रा. देऊळवाडी, मळगाव, ता. सावंतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२३) चे कलम ९, ३९, ५१ आणि ५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकुळ वनपाल नामदेव चौगुले, आंबोली वनपाल सम्राट पाटील, चौकुळ वनरक्षक वासुदेव खोत, संकल्प जाधव, आंबोली वनरक्षक बदाम राठोड, संग्राम पाटील, अनिकेत देशमुख, अनिकेत आवारे आणि बाळा गावडे यांनी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास चौकुळ वनपाल करत आहेत.












