रायगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत LED पद्धतीने मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून संयुक्त गस्ती दरम्यान कारवाई करण्यात आली. ही कारवाई १७ व १८ डिसेंबरच्या मध्यरात्री समुद्रात गस्ती नौकेद्वारे करण्यात आली.
पनवेल तालुक्यातील केळवणे येथील ‘साई गणेश’ (IND-MH-7-MM-1318) ही नौका खदेरीच्या समुद्रात पकडण्यात आली, तर अलिबाग किनाऱ्याजवळील ‘हेरंब कृपा’ (IND-MH-3-MM-4194) या नौकेवरही कारवाई झाली.
१८ डिसेंबर रोजी उरणजवळील ‘श्री समर्थ कृपा’ (IND-MH-7-MM-3627) या नौकेची तपासणी करण्यात आली असता उच्च क्षमतेचे अंडर-वॉटर LED लाईट, सिया लाईट, हॅलोजन बल्ब आणि जनरेटर असा मोठा साठा जप्त करण्यात आला.
अनधिकृत मासेमारीविरोधातील ही कारवाई सहआयुक्त (सागरी) महेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त, तसेच परवाना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. जप्त नौका व साहित्य विभागाच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.












