कोल्हापूरच्या सई जाधव भारतीय सैन्य अकादमीतून उत्तीर्ण पहिली महिला अधिकारी

अवघ्या वयाच्या २३ व्या वर्षी लेफ्टनंट पदाची जबाबदारी खांद्यावर

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापुर: भारतीय सैन्य अकादमीच्या गेल्या ९३ वर्षांच्या इतिहासातील प्रशिक्षण घेऊन ते पूर्ण करणारी पहिली महिला अधिकारी म्हणून कोल्हापूरच्या सई जाधव हिने अभिमानास्पद मान पटकावला आहे. भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट म्हणून त्यांना कमिशन मिळाले असून शनिवारी झालेल्या पीपींग सेरेमनीवेळी आई-वडिलांनी तिच्या खांद्यांवर स्टार लावले. वयाच्या २३ व्यावर्षी तिने हे यश संपादन केले आहे.१९३२ साली स्थापन झालेल्या या अकादमीतून आतापर्यंत ६७ हजार अधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले; परंतु सई या अशा पहिल्या महिला अधिकारी आहेत की ज्यांनी हे प्रशिक्षण पुरुषांसोबत पूर्ण केले. कारण पुढील वर्षी जूनमध्ये माहिलांची स्वतंत्र प्रशिक्षण तुकडी या ठिकाणी कार्यरत होणार आहे.

सई यांचे आजोबा ब्रिटिश सैन्यामध्ये कार्यरत होते, तर वडील संदीप जाधव हे मेजर म्हणून कार्यरत आहेत.मूळची जयसिंगपूरच्या सई जाधव हिला लहानपणापासूनच लष्करात जायचे होते. तिच्या ध्येयाशी कोणतीही तडजोड न करता प्रचंड मेहनतीने तिने हा टप्पा गाठला आहे. या प्रशिक्षणात १६ पुरुष कॅडेट्सबरोबर ती एकटी महिला होती. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार केल्यानंतर सई आता लष्करात टेरिटोरियल अधिकारी म्हणून रुजू होईल. चिकाटी आणि सातत्य ठेवून ध्येयपूर्ती केलेल्या आपल्या लेकीचा गौरव होताना पाहून तिच्या आईवडिलांचे डोळे पाणावले होते. तिचे प्राथमिक शिक्षण जयसिंगपूरमध्ये, माध्यमिक शिक्षण अंदमान निकोबारला, बारावीचे शिक्षण बेळगावमध्ये झाले असून पदवीचे शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. २ जानेवारी २०२५ रोजी ती उत्तराखंड येथे १३० बटालियनमध्ये अधिकारीपदाची सूत्रे हाती घेणार आहे.