बापर्डे, परुळे बाजार, लोरे व कुब्रल ही चार गावे स्वच्छ गाव सर्वेक्षणासाठी झाली सज्ज!

केंद्र सरकारच्या अभियानासाठी 4 गावांचे झाले नामांकन : जि. प. चे सीईओ प्रजित नायर

सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छता अभियानामध्ये नेहमीच अग्रेसर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे, परुळे बाजार, लोरे व कुब्रल ही चार गावे स्वच्छ गाव सर्वेक्षणासाठी सज्ज झाली आहेत. या चारही ग्रामपंचायतचे नामांकन या सर्वेक्षणासाठी झाले असून ऑगस्ट मध्ये या ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामिण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत बापर्डे, तालुका देवगड., ग्रामपंचायत परुळेबाजार, तालुका वेंगुर्ला., ग्रामपंचायत लोरे, तालुका कणकवली., ग्रामपंचायत कुंब्रल तालुका दोडामार्ग या 4 ग्रामपंचायतीचे नामाकंण केंद्रस्तराकरीता झाले असुन दिनांक 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान केंद्रस्तरीय समितीच्या माध्यमातुन तपासणी होणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीची राज्यस्तराकरीता जिल्हास्तर तपासणी समितीच्या माध्यमातुन निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या 15 ग्रामपंचायतीची दिनांक 5 जुलै ते 8जुलै 2023 या कालावधीत राज्यस्तर तपासणी समितीच्या माध्यमातुन तपासणी पुर्ण करण्यात आली होती. स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा) 2023 अंतर्गत राज्यस्तरावरुन निवड करण्यात आलेल्या राज्यातील 32 ग्रामपंचायतीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत बापर्डे, तालुका देवगड., ग्रामपंचायत परुळेबाजार, तालुका वेंगुर्ला., ग्रामपंचायत लोरे, तालुका कणकवली., ग्रामपंचायत कुंब्रल तालुका दोडामार्ग या 4 ग्रामपंचायतीची निवड केंद्रस्तर स्पर्धेकरीता झाली आहे. या ग्रामपंचायतीचे नामनिर्देश राज्यस्तरावरुन केंद्रस्तरावर पाठविण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतीची दिनांक 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान केंद्रस्तरीय समितीच्या माध्यमातुन तपासणी होणार आहे. तपासणीमध्ये वैयक्तिक शौचालय बाधकाम व वापर, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी स्वच्छता, गावातील स्वच्छतेबाबत जाणीव जागृती याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री. प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.