​पारपोली येथे ‘ट्री हाऊस’ आणि ‘फुलपाखरू महोत्सवा’चे उद्या थाटात उद्घाटन

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

​सावंतवाडी । प्रतिनिधी : निसर्गसंपन्न पारपोली गावाच्या शिरपेचात पर्यटनाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला जात असून, वन विभागातर्फे साकारण्यात आलेल्या पारपोली ट्री हाऊस, भव्य स्वागत कमान आणि पारपोली फुलपाखरू महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा उद्या, शनिवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता पार पडणार आहे.
​या सोहळ्याचे अध्यक्षस्थान राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार ना. श्री. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषद सदस्य श्री. निरंजन डावखरे, श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, सावंतवाडीचे आमदार श्री. दीपक केसरकर आणि कुडाळचे आमदार श्री. निलेश राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
​या कार्यक्रमाला प्रशासकीय स्तरावरून कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) श्री. जी. गुरुप्रसाद, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबूडकर आणि पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहििकर हे निमंत्रित अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
​पारपोली हे गाव जैवविविधतेने नटलेले असून फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ट्री हाऊस आणि इतर सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमिला शिंदे आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा नाईक यांच्यासह समस्त वन कर्मचारी वृंद, वनपरिक्षेत्र आंबोली यांनी केले आहे. या उद्घाटन सोहळ्याला निसर्गप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.