सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या इनोव्हा कारला बोलेरो पिकअपची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विधान रमेश पारवार ( २८, रा. कोलगाव सावंतवाडी) या युवकाचे गोवा बांबोळी रुग्णालयात बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या निधनामुळे कोलगाव परिसरात शोककाळा पसरली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे उभ्या असलेल्या इनोव्हा कारला बोलेरो पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघे युवक जखमी झाले होते. यात विधान पारवार ( कोलगांव सावंतवाडी), राहुल बोडे (रा. झाराप), सागर कदम (गोठोस) व आरती नांदोस्कर (कोचरे) हे चौघे जखमी झाले होते. त्यातील राहुल बोडे आणि विधान पारवार याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर विधानवर गोवा बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.
विधानच्या पश्चात आई व वडिल असा परिवार आहे. एकूलत्या एका मुलाच्या निधनामुळे पारवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.