पाषाण, सिंहगड रोड आणि चिंचवड परिसरात वेगवेगळ्या पद्धतीने सायबर फसवणूक
लष्करी अधिकाऱ्यासह रिअल इस्टेट सल्लागार आणि नागरिक बळी
ऑनलाइन RTO चलनाच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी पुण्यातील तिघांची फसवणूक करत तब्बल 11.33 लाख रुपये लंपास केले आहेत. 5 ते 15 डिसेंबरदरम्यान ही फसवणूक झाली असून पाषाण येथील लष्करी अधिकारी, सिंहगड रोड परिसरातील रिअल इस्टेट सल्लागार आणि चिंचवडमधील एका नागरिकाचा यात समावेश आहे. चलनाची बनावट लिंक, खोटे फोन कॉल आणि APK फाइल्स वापरून आरोपींनी बँक व क्रेडिट कार्डची माहिती मिळवली. या तिन्ही प्रकरणांत चतुश्रुंगी, सिंहगड रोड आणि चिंचवड पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा लिंक व फाइल्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
पुणे : 5 ते 15 डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन RTO चलन फसवणुकीच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 11.33 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चतुश्रुंगी, सिंहगड रोड आणि चिंचवड पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पाषाण येथील 49 वर्षीय लष्करी अधिकाऱ्याला 15 डिसेंबर रोजी चलनाची एक लिंक प्राप्त झाली. लिंक उघडल्यानंतर 590 रुपयांचे प्रलंबित चलन असल्याचे दाखवण्यात आले. त्यामध्ये तपशील भरण्यासाठी फॉर्म आणि OTP देण्यात आला होता. फॉर्म भरल्यानंतर काही वेळातच क्रेडिट कार्डवरून 3.83 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा संदेश आला. ही रक्कम हाँगकाँगमधील हॉटेल्समध्ये हाँगकाँग डॉलरमध्ये ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्रहार डिजिटल शी बोलताना पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय रिअल इस्टेट सल्लागाराला 5 डिसेंबर रोजी एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपण मुंबई RTO मधून बोलत असल्याचा दावा करत वाहनावर चलन असल्याचे सांगितले. तक्रारदाराने आपल्याकडे वाहन नसल्याचे सांगत कॉल बंद केला. मात्र काही वेळानंतर त्याच्या एका सिमकार्डचे नेटवर्क अचानक बंद झाले. 6 डिसेंबर रोजी त्याच्या बँकेकडून IMPS द्वारे 5 लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचा संदेश आला. यानंतर त्याने तात्काळ ऑनलाइन तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासानंतर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
चिंचवड परिसरातील प्रकरणात, पीडित नागरिकाला 5 डिसेंबर रोजी प्रलंबित RTO चलनासंदर्भातील .APK फाइल पाठवण्यात आली. ती फाइल उघडताच सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाईलवर थेट प्रवेश मिळवला. त्यानंतर दोन बँक खात्यांतून अडीच लाख रुपये काढून फसवणूक करण्यात आली. पीडितेने सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून प्राथमिक तपासानंतर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना RTO चलनाच्या नावाने येणाऱ्या लिंक, कॉल किंवा APK फाइल्सवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.













