घरगुती उपकरणांमधून घरातील हवेत सूक्ष्म कणांचा मारा; आरोग्यासाठी लपलेला मोठा धोका उघड

टोस्टर, एअर फ्रायर आणि हेअर ड्रायर ठरले धोकादायक

अतिसूक्ष्म कण फुफ्फुसांमधून थेट रक्तप्रवाहात जाण्याचा धोका

दैनंदिन वापरातील अनेक घरगुती उपकरणे शांतपणे घरातील हवेत अब्जावधी सूक्ष्म कण सोडत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. दक्षिण कोरियातील पुसान नॅशनल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात टोस्टर, एअर फ्रायर आणि हेअर ड्रायरमधून मोठ्या प्रमाणावर अतिसूक्ष्म कण उत्सर्जित होत असल्याचे आढळले. हे कण मानवी श्वसनसंस्थेत खोलवर जाऊन गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. विशेषतः लहान मुलांसाठी हा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरातील प्रदूषणाचा हा धोका बाहेरील हवेइतकाच गंभीर असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.


सोल : दैनंदिन वापरातील घरगुती गॅझेट्स घरातील हवेत ट्रिलियनच्या संख्येने अतिसूक्ष्म कण सोडत असल्याचा धक्कादायक खुलासा दक्षिण कोरियातील पुसान नॅशनल युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी केला आहे. टोस्टर, एअर फ्रायर आणि हेअर ड्रायर यांसारख्या सामान्य उपकरणांची चाचणी करताना हे निष्कर्ष समोर आले.

संशोधकांनी सीलबंद प्रयोगशाळा चेंबर तयार करून उपकरणांमधून निघणाऱ्या अल्ट्राफाईन पार्टिकल्स (UFPs) ची अचूक मोजणी केली. हे कण १०० नॅनोमीटरपेक्षा लहान असून नाकातील नैसर्गिक संरक्षण प्रणालीला चकवा देतात. हे कण फुफ्फुसांच्या ऊतींमध्ये आणि थेट रक्तप्रवाहात प्रवेश करतात, त्यामुळे लहान मुलांना अधिक धोका निर्माण होतो.

या कणांमध्ये तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम, चांदी आणि टायटॅनियम यांसारख्या जड धातूंचा समावेश आढळला. हे धातू उपकरणांतील गरम कॉइल्स आणि मोटर्सच्या घर्षणातून हवेत मिसळत असल्याचा अंदाज आहे. एकदा श्वासातून शरीरात गेल्यानंतर हे घटक जळजळ आणि पेशींचे नुकसान घडवू शकतात.

संशोधनानुसार रिकाम्या अवस्थेत चालवलेले पॉप-अप टोस्टर सर्वात मोठे प्रदूषक ठरले. या टोस्टरमधून दर मिनिटाला सुमारे १.७३ ट्रिलियन अतिसूक्ष्म कण बाहेर पडत असल्याचे आढळले. एअर फ्रायर स्वयंपाकादरम्यान सातत्याने कण सोडतात, तर ब्रश असलेल्या DC मोटर्सचे हेअर ड्रायर अचानक कणांचा मोठा स्फोट करतात.

मात्र, ब्रशलेस मोटर्स वापरल्यास हे उत्सर्जन १० ते १०० पट कमी होऊ शकते, असेही अभ्यासात स्पष्ट झाले. जरी हा अभ्यास दक्षिण कोरियन मॉडेल्सवर आधारित असला, तरी जगभरात समान तंत्रज्ञान वापरले जात असल्याने जागतिक परिणाम संभवतात.

थेट आरोग्य चाचण्या नसल्या तरी, यापूर्वीच्या संशोधनांमध्ये अतिसूक्ष्म कणांचा संबंध दम्याचे झटके, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अगदी कर्करोगाच्या जोखमीशी जोडला गेला आहे. घरातील प्रदूषण हळूहळू वाढत जाते, विशेषतः वर्क फ्रॉम होम आणि उष्ण हवामानामुळे लोक जास्त वेळ घरात राहतात.

प्रोफेसर चांगह्युक किम यांच्या मते, भविष्यात कमी उत्सर्जन करणारी उपकरणे डिझाइन करणे आणि मुलांसाठी स्वतंत्र हवेच्या गुणवत्तेचे निकष ठरवणे गरजेचे आहे. उत्पादकांनी फिल्टर्स, थंड साहित्य आणि ब्रशलेस तंत्रज्ञान वापरण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सुचवले.

सामान्य नागरिकांनीही काही सोपे उपाय करू शकतात. उघड्या खिडक्यांजवळ टोस्टर किंवा एअर फ्रायर वापरणे, एक्झॉस्ट फॅन चालू ठेवणे, रिकाम्या अवस्थेत उपकरणे न चालवणे आणि घरातील हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स वापरणे उपयुक्त ठरू शकते.

या संशोधनाचे निष्कर्ष २०२५ च्या उत्तरार्धात जर्नल ऑफ हॅझर्डस मटेरियल्स मध्ये प्रसिद्ध झाले असून, घरातील प्रदूषण हा आधुनिक काळातील गंभीर धोका असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. जागरूक खरेदी आणि लहान सवयीतील बदल घरातील हवा अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.