कठोर स्क्रीनिंगमुळे दूतावासांमध्ये अपॉइंटमेंट बॅकलॉग
H-1B व्हिसा धारकांना आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचा सल्ला
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भारतासह जगभरातील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये व्हिसा अपॉइंटमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याची कबुली दिली आहे. सुधारित आणि कठोर स्क्रीनिंग प्रक्रियेमुळे व्हिसा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १२ महिन्यांपर्यंत कालावधी लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका H-1B व्हिसा धारकांना बसत असून अनेक टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना प्रवासाविषयी सावधगिरीचा इशारा दिला आहे. Google आणि Apple यांसारख्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेबाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. या विलंबामुळे शेकडो भारतीय व्यावसायिक परदेशात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वॉशिंग्टन : यूएस स्टेट डिपार्टमेंट ने भारतासह जगभरातील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये व्हिसा अपॉइंटमेंटमध्ये लक्षणीय विलंब होत असल्याची कबुली दिली आहे. सुधारित स्क्रीनिंग प्रक्रियेमुळे व्हिसा प्रक्रियेचा कालावधी १२ महिन्यांपर्यंत वाढला असल्याचे विभागाने मान्य केले आहे.
प्रहार डिजिटल शी बोलताना स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले की, पूर्वी प्रतीक्षा वेळ कमी करण्यावर भर होता, मात्र आता प्रत्येक व्हिसा अर्जाची सखोल तपासणी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. यामुळे प्रक्रिया वेळ वाढत असली तरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही पावले आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या विलंबाचा परिणाम Google आणि Apple यांसारख्या आघाडीच्या टेक कंपन्यांवरही झाला आहे. या कंपन्यांनी H-1B व्हिसा धारक कर्मचारी आणि त्यांच्या आश्रितांना आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेबाहेर दीर्घकाळ अडकण्याचा धोका लक्षात घेऊन हा इशारा देण्यात आला आहे.
कंपन्यांच्या इमिग्रेशन लॉ फर्म्स ने कर्मचाऱ्यांना मेमो पाठवत सांगितले आहे की, व्हिसावर पुन्हा प्रवेशासाठी शिक्का आवश्यक असल्यास देशाबाहेर जाणे टाळावे. कारण अपॉइंटमेंट रद्द किंवा पुनर्निर्धारित झाल्यास संबंधित कर्मचारी महिनोन्महिने परदेशात अडकू शकतात.
दरम्यान, सोशल मीडिया स्क्रीनिंग ही आणखी एक मोठी अडचण ठरत आहे. ट्रम्प प्रशासनाने लागू केलेल्या नव्या नियमांनुसार Facebook, Twitter, Instagram यांसह सोशल मीडिया खात्यांची तपासणी केली जात असून, त्यामुळे अपॉइंटमेंट बॅकलॉग वाढत आहे. याचा फटका H-1B कामगार, त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटरना बसत आहे.
रेड्डी न्यूमन ब्राउन पीसी या इमिग्रेशन फर्मनुसार, आयर्लंड आणि व्हिएतनाम यांसह अनेक देशांमध्ये व्हिसा अपॉइंटमेंट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डिसेंबरमधील व्हिसा नूतनीकरणाच्या भेटी अचानक रद्द झाल्याने शेकडो भारतीय व्यावसायिक अडकले आहेत.
स्टेट डिपार्टमेंटने स्पष्ट केले आहे की, अर्जदार केस-दर-केस आधारावर तातडीच्या अपॉइंटमेंटसाठी विनंती करू शकतात. मात्र, नवीन पडताळणी प्रक्रियेत संभाव्य राष्ट्रीय सुरक्षा धोका तपासण्यासाठी ऑनलाइन उपस्थितीचे सखोल पुनरावलोकन केले जात असल्याने प्रक्रिया अधिक वेळखाऊ होत आहे.
या व्हिसा विलंबाचा सर्वाधिक फटका तंत्रज्ञान कंपन्यांना बसत आहे, कारण त्या मोठ्या प्रमाणावर H-1B प्रोग्रामवर अवलंबून आहेत. दरवर्षी ८५,००० नवीन H-1B व्हिसाची मर्यादा असून, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये Google ने ५,५३७ तर Apple ने ३,८८० H-1B व्हिसासाठी अर्ज केले होते.
उपलब्ध माहितीनुसार, जारी होणाऱ्या H-1B व्हिसांपैकी ७० टक्क्यांहून अधिक व्हिसा भारतीय नागरिकांना मिळतात. इमिग्रेशन ॲटर्नी जेसन फिंकेलमन यांनी सल्ला देताना सांगितले की, वैध व्हिसा स्टॅम्प असलेले नागरिक सामान्यतः अमेरिकेत परत येऊ शकतात, मात्र अनावश्यक प्रवास टाळणेच सध्या योग्य ठरेल.
ते पुढे म्हणाले, “सध्या प्रवास अत्यावश्यक नसेल, तर थांबणे अधिक सुरक्षित आहे.” कारण कॉन्सुलर अपॉइंटमेंट रद्द झाल्यास अनेक H-1B कामगारांना अमेरिकेत कामावर परतण्यासाठी अनिश्चित कालावधी लागण्याची शक्यता आहे.











