१४ वर्षांनंतर खेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा; २१ पैकी २१ जागांवर ऐतिहासिक विजय

खेड (प्रतिनिधी) – खेड नगरपरिषदेवर जवळपास १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला असून, २०२५ च्या निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक कामगिरी करत २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवला आहे. खेडच्या जनतेने दाखवलेला हा कौल शिवसेनेवरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या निकालामुळे संपूर्ण तालुक्यात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विजयानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्यांनी खेडच्या जनतेचे आभार मानत, पुढील पाच वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू, असा निर्धार व्यक्त केला. रामदास भाई कदम यांच्या दूरदृष्टीचे हे फळ असून, सर्व कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या अथक मेहनतीमुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी बहुसंख्य शिवसेनेचे असून, काही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनीही यश मिळवले आहे. नगराध्यक्षपदही शिवसेनेकडे आले आहे.

यापूर्वी रामदास भाई कदम खेड मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना नगरपरिषदेमध्ये शंभर टक्के शिवसेनेचे नगरसेवक निवडून येत होते. त्यानंतर दीर्घ काळाने २०२५ मध्ये पुन्हा एकदा तशीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. यावरून खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि पुढेही राहील, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोकणात मिळालेला हा विजय केवळ नगरपरिषदपुरता मर्यादित नसून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीही विजयाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसैनिकांनी आणि जनतेने दाखवलेला हा विश्वास असून, त्याचे प्रतिबिंब या निकालातून दिसून येते.

नेत्यांनी पुढे बोलताना, कोकणातून सुरू झालेली ही विजयी घोडदौड येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही कायम राहील, असा दावा केला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि रत्नागिरी हे पुन्हा एकदा शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून अधोरेखित झाले असून, संपूर्ण जिल्ह्यावर शिवसेनेची पकड मजबूत झाल्याचे चित्र आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारा शिवसैनिक कोकणात असो वा मुंबईत, तो शिवसेनेशी निष्ठावान राहील आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही त्याची पुनरावृत्ती निश्चितपणे दिसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अखेरीस सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, कोकण आणि शिवसेना हे समीकरण कधीही तुटणार नाही, असे ठाम मत गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी विजय उत्सव प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.