गुहागर नगरपंचायतीत कमळ फुलले

नगराध्यक्षपदी भाजपच्या नीता मालप विजयी

मनसेचा चंचुप्रवेश,तर उबाठाला केवळ 2 जागेवर यश

आशिष कारेकर | गुहागर
गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत युतीने आपले वर्चस्व निर्माण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदाची माळ भाजपच्या नीता विकास मालप यांच्या गळ्यात पडली आहे. तब्बल 997 मतांच्या मताधीक्याने विजय मिळवून भाजपने याठिकाणी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.येथील नगरपंचायत निवडणुकीत प्रथमच भाजपने आपला नगराध्यक्ष निवडून आणून ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.

या नगरपंचायत निवडणुकीत भाजपने एकूण 6 जागांवर विजय संपादन केला आहे,शिवसेनेकडून एकूण 7 नगरसेवक निवडून आले आहेत तर उबाठाकडून केवळ 2 जागांवर विजय मिळवला असून मनसेने प्रथमच प्रभाग क्रमांक 4 मधून आपला उमेदवार निवडून आणून येथील नगरपंचायत निवडणुकीत प्रथमच चंचुप्रवेश केला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना अवघ्या 1 जागेवर विजय मिळवता आला आहे. एकूणच याठिकाणी युतीचे तब्बल 13 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेना युतीने याठिकाणी आपली सत्ता काबीज केली आहे.
गुहागर नगरपंचायत निवडणूकित नगराध्यक्ष पदासाठी एकूण 4 उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये भाजपकडून नीता विकास मालप यांनी तब्बल 997 मतांनी विजय मिळवत पहिल्यांदा गुहागर नगरपंचायतीवर कमळ फुलवले आहे.तर प्रभाग क्रमांक 1 मधून उबाठाकडून समीर यशवंत बागकर यांनी 142 मिळवून 131 मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचे उमेश अनंत भोसले यांनी 219 मते मिळवून 120 मतांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेकडून स्वरा गणेश तेलगडे यांनी 183 मते मिळवून 84 मतांनी विजय मिळवला प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष म्हणून असलेल्या मनसे पुरस्कृत उमेदवार कोमल दर्शन जांगली यांनी 133 मते मिळवून 14 मतांनी विजय मिळवला.प्रभाग क्रमांक 5 मधून वैशाली संतोष मावळणकर भाजप यांनी निवडणुकीपूर्वीच बिनविरोध विजय संपादन केला होता.प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या अनुषा शार्दुल भावे यांनी 177 मते मिळवून तब्बल 155 मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेनेकडून विदिशा धनंजय दणदणे यांनी 104 मते मिळवून अवघ्या 6 मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या सुषमा सुधाकर रहाटे यांनी 118 मते मिळवून अवघ्या 5 मतांनी विजय मिळवला.प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपच्या मीरा विकास घाडे यांनी 134 मते मिळवून 34 मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेकडून प्रदीप गोविंद बेंडल यांनी 154 मते मिळवून 91 मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेकडून सुजित सुधाकर साटले यांनी 201 मते मिळवून 175 मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपच्या विशाखा विश्वास सोमण यांनी 120 मते मिळवून 58 मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेकडून राजेंद्र अर्जुन भागडे यांनी 177 मते मिळवून 158 मतांनी विजय मिळवला.प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सौरभ राजेंद्र भागडे यांनी 140 मते मिळवून अवघ्या 28 मतांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेनेकडून संदेश सुरेश उदेग यांनी 223 मते मिळवून तब्बल 209 मतांनी विजय मिळवला.प्रभाग क्रमांक 16 मध्ये अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत शिवसेनेकडून अमोल प्रताप गोयथळे यांनी 169 मते मिळवून अवघ्या 4 मतांनी विजय मिळवला.तर प्रभाग क्रमांक 17 मधून उबाठाच्या श्रिया सागर मोरे यांनी 151 मते मिळवून 22 मतांनी विजय मिळवला.