खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाने मोठा विजय मिळवत तब्बल १४ वर्षांनंतर एकहाती सत्ता मिळवली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत प्रतिस्पर्ध्यांना मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले असून महायुतीने एकूण २० पैकी २० जागांवर विजय मिळवला आहे.
या महायुतीमध्ये शिवसेनेचे १७ तर भाजपचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. महायुतीसमोर काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, अजित पवार गट आणि मनसे हे पक्ष एकत्र येत आव्हान उभे करत होते. मात्र मतदारांनी महायुतीवर विश्वास टाकत सर्व जागांवर विजयी कौल दिला असून खेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकला आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान प्रभाग क्रमांक ७अ मधील शिवसेनेचे उमेदवार स्वप्निल पांडुरंग सैतवडेकर यांनी पटकावला आहे. स्वप्निल सैतवडेकर यांनी ९६० मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार प्रणव म्हापुसकर यांचा १३५ मतांनी पराभव केला असून तब्बल ८२५ मतांच्या मोठ्या फरकाने ते विजयी झाले आहेत. त्यामुळे खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
या दणदणीत विजयानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात जल्लोष करण्यात आला. विजयी मिरवणुकीदरम्यान बोलताना स्वप्निल सैतवडेकर यांनी हा विजय आपला नसून जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा असल्याचे सांगितले. सरकारने केलेल्या विकासकामांची ही पोचपावती असल्याचे ते म्हणाले. इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याने विकासाची जबाबदारी अधिक वाढली असून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हेच आता प्राथमिक ध्येय राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले.
एकूणच खेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना व महायुतीने मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडणार असून आगामी काळात खेडच्या विकासाला नवे वळण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












