खेड (प्रतिनिधी) : “लेट पण थेट” अशी भूमिका मांडत भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी खेड तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांची महायुती अधिकृतपणे जाहीर केली. उशीर झाला असला तरी थेट आणि स्पष्ट निर्णय घेण्यात आला असून, या महायुतीच्या माध्यमातून मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या निवडणुकीत आरपीआय आपली संघटनात्मक ताकद दाखवणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली विधानसभा संपर्कप्रमुख स. तु. कदम यांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दर्शविताना, उमेदवारी प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे आरपीआयला सध्याच्या निवडणुकीत जागा देता आल्या नसल्याची कबुली दिली. मात्र, यापुढील सर्व निवडणुका आरपीआयला सोबत घेऊनच महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष गौतम तांबे, कोकण युवक प्रदेशाध्यक्ष सुशांत भाई सकपाळ यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यात महायुती अधिक बळकट करण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.
खेडच्या राजकारणात “लेट पण थेट” या घोषणेमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी निवडणुकांवर या महायुतीचा परिणाम महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











