रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील घटना; गुन्हा दाखल
रत्नागिरी : प्रतिनिधी
पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून सावत्र बापाला तरुणाने शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना शुक्रवार 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली.
अर्जुन भिवा पवार (38,रा.मुळ रा.पानवल होरंबेवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात गंगाराम गनू घोडेकर (76,मुळ रा.पणोरे नरसरीवाडी लांजा,रत्नागिरी सध्या रा.रत्नागिरी रेल्वेस्टेशन) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, हे नात्याने बाप व सावत्र मुलगा आहेत. यातील तक्रारदार गंगाराम घोडेकर हा रत्नागिरी परिसरात भिक मागून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी सायंकाळी तो रत्नागिरी परिसरात भिक मागून जमा झालेले पैसे रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे बसून मोजत असताना संशयित मुलगा अर्जुन भिवा पवारने त्याच्याकडे खर्चासाठी पैसे मागितले. यावर तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अर्जुनने गंगाराम घोडेकरला शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देत हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली.










